मनातील विचारांचे काहूर, नात्यांमधील ताण, छोट्या गोष्टींनी अस्वस्थ होणारे मन आणि सततच्या स्पर्धेत हरवलेला आनंद… अशा दैनंदिन जीवनातील प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्त्या आणि राजयोग शिक्षिका बी. के. शिवानीदीदी तब्बल दशकभरानंतर सोलापुरात येत आहेत. ‘सरल मन, सरल जीवन’ या विषयावर गुरुवारी, १९ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० ते रात्री ८ या वेळेत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर त्यांचा संवाद होणार आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी १२ हजार नागरिकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
१४० देशांमध्ये प्रवचन; दशकभराची प्रतीक्षा
शिवानीदीदी १४० देशांमध्ये प्रवचनासाठी प्रवास करतात. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे सोलापुरात येण्यासाठी दशकभर प्रतीक्षा करावी लागल्याचे बी. के. अनितादीदी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला बी. के. प्रदीप शिंगवी, बी. के. प्रज्ञादीदी, डॉ. नंदा भट्टड, बी. के. पूनमदीदी आणि बी. के. शिवराजभाई मजगे उपस्थित होते.
पूर्वनोंदणी आवश्यक; ध्यानशिबिर २० नोव्हेंबरपासून
हा कार्यक्रम विनामूल्य असून प्रवेशासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. www.omshanti.in/solapur या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. नोंदणी केलेल्यांनाच प्रवेशिका दिल्या जाणार आहेत. कार्यक्रमापूर्वी सायंकाळी पाचपासून माउंट अबू येथील अर्चनादीदी आणि अहमदाबाद येथील डॉ. ब्रह्मा व दामिनीदीदी यांचे सूरसंगीत होणार आहे. मैदानावर १२ हजार नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, होम मैदानावर पार्किंग तसेच रुग्णवाहिकेसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय शिवछत्रपती रंगभवन येथे २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय ‘मेडिटेशनचा जादुई प्रभाव’ शिबिर होणार आहे. सकाळी सात ते आठ आणि सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत बी. के. डॉ. दामिनीदीदी मार्गदर्शन करतील. अधिक माहितीसाठी ८६६९१६३३७२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Leave a Reply