रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दुधाचे दर लिटरमागे चार रुपयांनी वाढणार

दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर चार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुग्धजन्य पदार्थ महागणार असून शेतकऱ्यांना चांगले खरेदी दर मिळण्याची शक्यता आहे.

दुधाचे दर लिटरमागे चार रुपयांनी वाढणार

राज्याच्या डेअरी उद्योगात सध्या तेजी असून, दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर चार रुपये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे. खासगी व सहकारी दूध प्रकल्पांनी शेतकऱ्यांकडील दूध खरेदी दरात आणखी वाढ करण्याची तयारी ठेवली आहे. बाजारपेठेतील संतुलन राखण्यासाठी विक्री दरात वाढ करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

खरेदी दर टिकवण्यासाठी विक्री दरवाढ गरजेची

शेतकऱ्यांकडील दूध खरेदी दरातील तेजी टिकून राहण्यासाठी दुधाच्या विक्री दरात वाढ होणे गरजेचे असते. विक्री दर अधिक असल्यास खरेदी दरदेखील चांगला देणे डेअरीचालकांना आर्थिकदृष्ट्या शक्य होते. तसेच दूध भुकटी व लोण्याच्या बाजारात तेजी असल्यास खरेदी दर अधिक देणे शक्य होते. सध्या भुकटी व लोण्याचे दर तसेच दुधाचे खरेदी दर अशा तिन्ही आघाड्यांवर तेजी असल्यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदी होणाऱ्या गाय व म्हैस दुधाला यापुढेही चांगले दर मिळू शकतात, असे डेअरी उद्योगातून सांगण्यात आले. शुक्रवारी झालेल्या बैठकीत इंधनाचे दर, साखरेचे दर, पॅकिंग व वाहतूक खर्चात वाढ झाल्याचे तसेच शेतकऱ्यांकडील दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. खरेदी दर पुढील काळात वाढण्यास अनुकूल वातावरण असल्याने विक्री दरात वाढ करायला हवी, असा आग्रह डेअरीचालकांनी धरला. त्यानंतर संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनीही विक्री दरवाढीला अनुकूलता दर्शवली. त्यामुळे उद्यापासून गाय व म्हैस दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर चार रुपये वाढ होईल. तसेच दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत दहा टक्के वाढ केली जाणार आहे.

इतर डेअरींची दरवाढ; शेतकऱ्यांना सध्याचे दर

राज्यातील प्रमुख डेअरी प्रकल्पांनी विक्री दरात यापूर्वीच वाढ केलेली आहे. नंदिनीने दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर आठ रुपये, अमूलने चार रुपये, मदर डेअरीने सहा रुपये, तर गोकुळने दोन रुपयांची वाढ केली आहे. दुधाचे विक्री दर चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरेदी दरात मंदी येण्याची शक्यता आता मावळली आहे. सध्या शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रति लिटर ४२ ते ४३ रुपये, तर म्हैस दुधासाठी ५५ ते ५७ रुपयांपर्यंत खरेदी दर मिळतो आहे. दुसरीकडे डेअरी उद्योगात सध्या दूध भुकटीला प्रति किलो २९० ते ३०० रुपये, तर लोण्याला ५५० रुपयांपर्यंत दर दिला जातो आहे. दुष्काळी स्थितीत राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे खरेदी दर आणखी चांगले देण्याचा प्रयत्न डेअरी उद्योगाचा असल्याचे संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले. भुकटी व लोण्याचे दर तेजीत असून, त्यात वाढ झाल्यास शेतकऱ्यांना खरेदी दर तात्काळ वाढवून देण्याकडे डेअरीचालकांचा कल राहील, असे त्यांनी नमूद केले. चितळे डेअरी उद्योग समूहाचे संचालक श्रीपाद चितळे यांनी सांगितले की, राज्यातील दुष्काळी स्थिती तसेच बाजारपेठेत दूध व दुग्धजन्य पदार्थांना असलेल्या मागणीमुळे शेतकऱ्यांना दुधाचे खरेदी दर वाढवून देण्यास अनुकूल स्थिती तयार झाली आहे. म्हैस दुधाला ७ फॅट व ९ एसएनएफकरिता प्रति लिटर ६५ रुपयांपर्यंत, तर गाय दुधाला ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी ४१ रुपये आणि ४ फॅट व ८.५ एसएनएफसाठी ४२.५० रुपये मिळू शकतील, असे त्यांनी सांगितले.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance