मराठवाड्यातील भीषण दुष्काळ आणि ग्रामीण भागातील रोजगाराच्या अपुऱ्या संधींमुळे अनेक कुटुंबे गाव सोडून चाकण औद्योगिक वसाहतीकडे धाव घेत आहेत. बीड, धाराशिव, लातूरसह अनेक जिल्ह्यांतून येणाऱ्या स्थलांतरितांना मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरावी लागत आहे.
चाकणमध्ये रोजगाराच्या संधी
चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये वाहननिर्मिती, विविध वस्तूंचे उत्पादन, गोदामे आणि बांधकाम यांसारख्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. याच संधींच्या शोधात बीड, धाराशिव, लातूर, परभणी, जालना आणि नांदेड भागांतून तरुण, महिला आणि संपूर्ण कुटुंबे दररोज चाकण परिसरात दाखल होत आहेत.
गावाकडे शेती पावसावर अवलंबून असल्याने आणि यंदा दुष्काळाच्या तीव्रतेमुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने मुलांचे शिक्षण आणि घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे.
महागाईमुळे पगार अपुरा
चाकणमध्ये रोजगार मिळत असला तरी वाढते घरभाडे, महागाई आणि वाहतुकीचा खर्च यामुळे मिळणारा पगार अपुरा पडतो. अनेक कामगारांना कमी पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना आर्थिक कसरत करावी लागत आहे. एकीकडे औद्योगिक विकासामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्या तरी, दुसरीकडे ग्रामीण भागातील नागरिकांना गाव सोडावे लागत आहे.
मराठवाड्यात दुष्काळाचे मोठे सावट आहे. गावात पिण्यासाठी पाणी आणि रोजगाराच्या संधी नाहीत. त्यामुळे जगायचे कसे, हा प्रश्न अनेक कुटुंबांपुढे आहे. ज्यांना गावात काहीच आधार नाही, अशी कुटुंबे नाइलाजाने चाकणमध्ये येत असल्याचे अनेक तरुणांनी सांगितले. गावातच रोजगार आणि पाण्याची सोय झाल्यास हे स्थलांतर कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Leave a Reply