नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या सुमारे ४,२०० बंदिवानांना महापालिकेमार्फत पुरविल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. पाण्याची तपासणी करून अहवाल सादर करावा, अशी विनंती कारागृह प्रशासनाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे.
पाण्याच्या शुद्धतेबाबत पत्रव्यवहार
कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास त्र्यंबकांत विभूते यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवले आहे. कारागृहात न्यायाधीन आणि शिक्षाबंदी मिळून सुमारे ४,२०० कैदी असून, त्यामध्ये महिला तसेच लहान मुलांचाही समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येला पुरवले जाणारे पाणी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करण्याचे वरिष्ठ कार्यालयाचे निर्देश असून, पाणी दूषित असल्यास जुलाब, ताप यासह विविध जलजन्य आजारांचा फैलाव होण्याची शक्यता आहे.
अहवाल नकारात्मक आल्यास परिणाम
पाणी तपासणी अहवालातून पाण्याच्या शुद्धतेबाबत स्पष्टता येईल. दुसरीकडे अहवाल नकारात्मक आल्यास नाशिक रोड भागातील अनेक केंद्र व राज्य सरकारच्या कार्यालयांच्या पाणीपुरवठ्याबाबतही साशंकता निर्माण होण्याची शक्यता आहे. कारागृहासारख्या बंदिस्त परिसरात संसर्गजन्य आजार पसरल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे मोठे आव्हान ठरू शकते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाण्याची गुणवत्ता तपासणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बंदिवानांसाठी वापरण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासून त्याची गुणवत्ता निश्चित करावी, अशी विनंती करण्यात आली असून, ४,२०० बंदिवानांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय असल्याने महापालिकेचा पाणी तपासणी अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply