कर्नाटकमध्ये एका महिला प्रवाशाने पिकअपबाबत माहिती विचारली असता, बाईक टॅक्सीच्या चालकाने तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मुंबईतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात महिला बाईक टॅक्सीचा वापर करतात. त्यामुळे भविष्यात महिला सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.
चालकांची माहितीच उपलब्ध नाही
कर्नाटकातील प्रकरणानंतर संबंधित चालकाला तातडीने हटवण्यात आल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. तरीही प्रश्न कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. बाईक टॅक्सी कंपन्यांकडून चालकांची पोलिस पडताळणी होत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोकही चालक म्हणून कार्यरत असल्याची टीका मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी केली आहे. राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कंपनीने वडाळा आरटीओकडे ऑगस्ट महिन्यात अर्ज केला होता, मात्र शासनाच्या धोरणातील अटी व निकष अद्याप पूर्ण झालेले नाहीत. चालकांची माहिती कळवणे आवश्यक असतानाही कंपनीकडून वडाळा आरटीओला अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
महिला चालकाचा पर्याय आणि सुरक्षा नियमांची मागणी
महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला प्रवाशांना महिला चालकाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सरकारने कंपन्यांसाठी कडक सुरक्षा नियम तयार करून त्यांची योग्य अंमलबजावणी करावी, अशी मागणी वाहतूक अभ्यासक सुशील पठारे यांनी केली आहे. महिलांना सुरक्षित प्रवासाचा विश्वास मिळाला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास यांनी महिलांनी प्रवास करताना चालकाचा फोटो आणि गाडीचा नंबर तपासून पाहावा, तसेच प्रवासादरम्यान जीपीएस लोकेशन सुरू ठेवून कुटुंबीयांना शेअर करावे, असा सल्ला दिला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply