धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी राज्य परिवहन महामंडळ आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने विनापरवाना आंतरराज्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसवर कारवाई केली. या बसकडून साडेबारा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
धुळे ते इंदूर या मार्गावर प्रवासी वाहतूक करणारी ही बस शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास धुळे मध्यवर्ती बसस्थानकात दाखल झाली होती. बसच्या दर्शनी भागावर मध्य प्रदेश परिवहन अशी नोंद होती, तर काचेवर इंदूर असा मार्गदर्शक फलक लावण्यात आला होता. बसचा क्रमांक एमपी ४६, झेडडी ७६९४ असा आहे.
कागदपत्रांची तपासणी
संयुक्त पथकाने बसची तपासणी केली असता चालकाकडे आंतरराज्य प्रवासी वाहतुकीचा वैध परवाना नसल्याचे समोर आले. नियमांनुसार आवश्यक असलेले प्रतिस्वाक्षरीपत्र, अधिकृत भाडे तक्ता, वेळापत्रक आणि ना हरकत प्रमाणपत्र यापैकी एकही कागदपत्र चालकाकडे उपलब्ध नव्हते. शिवाय चालक गणवेशातही नव्हता.
दंडात्मक कारवाई
नियमांचे उल्लंघन करून अवैध प्रवासी वाहतूक केल्याची गंभीर दखल घेत पथकाने बसवर १२ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. ही रक्कम बसचालक आणि मालकाकडून वसूल करण्यात आली.
कारवाईच्या वेळी राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, आगार व्यवस्थापक संदीप निकम, संजय अवस्थी, संतोष काळे तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे श्रीकांत केदार आणि संदेश माने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईमुळे विनापरवाना आंतरराज्य वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply