शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

धुळ्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जनजातीय गौरव सेवा सप्ताह

बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त धुळ्यात ११-१८ नोव्हेंबर जनजातीय गौरव सेवा सप्ताह आहे. लाभवाटप, सांस्कृतिक कार्यक्रम व आरोग्य शिबिरे आयोजित आहेत.

धुळ्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जनजातीय गौरव सेवा सप्ताह

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त धुळे जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६ साजरा करण्यात येणार आहे. आदिवासी समाजाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, स्वातंत्र्यलढ्यातील अमूल्य योगदान आणि सर्वांगीण विकासाची दिशा यांचा संगम घडवून आणण्याच्या उद्देशाने विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी निवेदनातून दिली. आमदार मंजुळा गावित, अप्पर जिल्हाधिकारी विनय गोसावी, आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

दिवसनिहाय उपक्रम

१३ नोव्हेंबरला शेवगे (ता. साक्री) येथील शासकीय आश्रमशाळा येथे कल्याणकारी योजनांचा लाभवाटप दिन होईल. न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत धनादेश वाटप, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, पीएम-जनमन आणि महिला बचत गटांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ दिला जाईल. १४ नोव्हेंबरला आदिवासी स्मारके व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता, सायंकाळी सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव आणि आदिवासी लोकसंस्कृती व परंपरेचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील. १५ नोव्हेंबरला धुळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीचा मुख्य सोहळा होईल. यात पद्म पुरस्कार विजेते, समाजसेवक, बुद्धिजीवी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा विशेष सत्कार केला जाईल. तसेच उद्याने, चौक व रस्त्यांना आदिवासी महापुरुषांची नावे देण्याबाबत कार्यवाही केली जाईल. १६ नोव्हेंबरला नागरिकांच्या सोयीसाठी नागरी सेवा व कागदपत्रे शिबिरे आयोजित करून आधार अद्यावतीकरण, वनपट्टेधारकांना लाभ वाटप आणि कृषी विभागाच्या ऑनलाइन योजना व पीकविमा नोंदणीबाबत प्रात्यक्षिके दाखवली जातील. १७ नोव्हेंबरला आरोग्य विभागाच्या सहकार्याने सिकलसेल तपासणी व जनजागृती, मोफत आरोग्य चाचण्या, माता-बाल आरोग्य आणि पौष्टिक तृणधान्यांबाबत जनजागृती शिबिरे घेतली जातील. १८ नोव्हेंबरला युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा, कौशल्य विकास प्रशिक्षण, शिष्यवृत्ती व जात वैधता मार्गदर्शन आणि डिजिटल आर्थिक साक्षरता मार्गदर्शन शिबिर आयोजित करून सप्ताहाचा समारोप होईल.

सहभागाचे आवाहन

आदिवासी बांधवांनी या सेवा सप्ताहातील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री रावल, आमदार गावित, अपर जिल्हाधिकारी गोसावी, प्रकल्पाधिकारी पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी केले आहे.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance