छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी बसलेल्या दोन लाख ९६ हजार ११४ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळाला आहे. शुल्क भरलेल्या ५१ महाविद्यालयांतील २५ हजार ७४ विद्यार्थ्यांचे शुल्क दिवाळी सुटीतही कार्यालय सुरू ठेवून परत करण्यात आले. ही माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली.
परीक्षांचे वेळापत्रक आणि टप्पे
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून मूल्यांकन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी परीक्षा विभागाने प्रयत्न केले. प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांच्या अध्यक्षतेखाली ‘टास्क फोर्स’ही प्रयत्नशील राहिला. २७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या परीक्षांमध्ये बी.ए., बी.एस्सी., बी.कॉम. यासह एकूण १४ पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर अशा दोन टप्प्यांत या परीक्षा घेतल्या जात आहेत. पदवी परीक्षांचे पेपर २७ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत, तर सर्व व्यावसायिक व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.
शुल्क परताव्याची प्रक्रिया
दिवाळी सुटीच्या काळात ६ व ७ नोव्हेंबर या दोन दिवशी परीक्षा विभागातील समन्वय विभाग सुरू ठेवण्यात आला. एकूण ५१ महाविद्यालयांतील २५ हजार ७४ विद्यार्थ्यांनी एक कोटी ८८ लाख ३३ हजार ७६१ रुपये परीक्षा शुल्क जमा केले होते. यातील ३४ महाविद्यालयांनी एक कोटी ३६ लाख ४४ हजार ७५६ रुपयांचे धनादेश दिवाळी सुटीत परत नेले. संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना तत्काळ शुल्क परत करावे, असे डॉ. डोळे यांनी कळवले आहे. परीक्षा विभागातील समन्वयक विभागाचे उपकुलसचिव डॉ. विष्णू कऱ्हाळे, राजेंद्र गांगुर्डे, महेंद्र पैठणे, हरिदास खुडे आदी कर्मचारी यासाठी प्रयत्नशील आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply