येवला तालुक्यातील चांदगाव येथील आदिवासी वस्तीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागलेल्या भीषण आगीत मनोहर मोरे यांच्या राहत्या झोपडीसह त्यांचा संपूर्ण संसार जळून खाक झाला. घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडेलत्ता, भांडी आणि रोख रक्कम आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ऐन दिवाळीच्या सणात हे कुटुंब उघड्यावर पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
काही मिनिटांत झोपडी आगीच्या विळख्यात
दुपारी अचानक मोरे यांच्या झोपडीतून धुराचे लोट निघू लागले. क्षणात आगीच्या ज्वालांनी संपूर्ण झोपडीला विळखा घातला. झोपडी लाकूडफाटा आणि गवताची असल्याने आगीने अवघ्या काही मिनिटांत रौद्ररूप धारण केले. वस्तीतील नागरिकांनी आरडाओरड ऐकून तत्काळ धाव घेतली आणि पाण्याचे हंडे व बादल्या आणून आग विझवण्याचे प्रयत्न केले. आग प्रचंड असल्याने घरातील वस्तू बाहेर काढण्याची संधी मिळाली नाही. आग नियंत्रणात येईपर्यंत संपूर्ण घर आणि त्यातील साहित्य जळून कोळसा झाले होते.
अंगावरील कपड्यांवाचून काहीही शिल्लक नाही
आगीच्या तांडवातून कुटुंब सुदैवाने बचावले असले, तरी त्यांची आर्थिक आणि मानसिक स्थिती पूर्णपणे ढासळली आहे. कष्टाने उभा केलेला संसार डोळ्यादेखत जळून राख झाल्याचे पाहून कुटुंबातील सदस्यांनी आक्रोश केला. घरात साठवून ठेवलेले महिनाभराचे अन्नधान्य, दिवाळीसाठी आणलेले सामान, मुलांचे कपडे, महत्त्वाची कागदपत्रे आणि मोलमजुरी करून साठवलेली पुंजी असा सर्व ऐवज आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. सध्या या कुटुंबाकडे अंगावरील कपडे वगळता काहीही शिल्लक राहिलेले नाही. लहान मुलांना घेऊन आता राहायचे कुठे आणि सण कसा साजरा करायचा, असा गंभीर प्रश्न या कुटुंबासमोर उभा ठाकला आहे.
संपूर्ण संसार डोळ्यांदेखत भस्मसात झाल्याचे पाहून मोरे कुटुंबीय हवालदिल झाले असून, त्यांनी शासनाकडे आर्थिक व निवाऱ्याची तातडीची मदत मिळण्याची मागणी केली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply