दिवाळीच्या धुरामुळे गुदमरलेल्या नाशिककरांना हवा गुणवत्तेत काहीसा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताज्या आकडेवारीनुसार शहरातील हवेची गुणवत्ता झपाट्याने सुधारत असून खराब श्रेणीत गेलेला हवा गुणवत्ता निर्देशांक अवघ्या तीन दिवसांत मध्यम श्रेणीत आला आहे.
तीन दिवसांत ७४ अंकांची घसरण
९ नोव्हेंबर रोजी शहराचा सरासरी एअर क्वॉलिटी इंडेक्स (एक्यूआय) २३२ नोंदविला गेला होता. दुसऱ्याच दिवशी, १० नोव्हेंबर रोजी तो १५४ वर आला, तर ११ नोव्हेंबर रोजी तो १५८ वर स्थिरावला. म्हणजेच दिवाळीनंतर दोन दिवसांतच निर्देशांकात तब्बल ७४ अंकांची घसरण झाली. फटाक्यांचा धूर निवळणे, वाऱ्याची हालचाल वाढणे आणि तापमानातील बदल यामुळे ही सुधारणा झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
शहरातील चारही मोजमाप केंद्रांवर ११ नोव्हेंबरला मध्यम श्रेणी नोंदविली गेली. पांडव नगरी परिसर अजूनही सर्वाधिक प्रदूषित असून तेथे १८६ एक्यूआय नोंदविला गेला. त्यापाठोपाठ हिरावाडी येथे १५९, गंगापूर रस्त्यावर १४८ आणि अंबड औद्योगिक वसाहतीत सर्वात कमी १३२ एक्यूआय नोंदविला गेला.
याआधी ९ नोव्हेंबरला परिस्थिती अधिक गंभीर होती. त्या दिवशी पांडव नगरीत दिवसभराची सरासरी २८८, हिरावाडीत २२८, गंगापूर रस्त्यावर २१५ आणि अंबडमध्ये २०४ होती. म्हणजेच सर्वच केंद्रे खराब श्रेणीत होती. दिवाळीत फटाक्यांमधून बाहेर पडलेले सूक्ष्म कण, वाहनांचा धूर, बांधकामांमुळे उडणारी धूळ आणि थंडीच्या दिवसांत जमिनीलगत साचून राहणारे प्रदूषक, या सर्वांचा एकत्रित परिणाम ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान दिसून आला. पांडव नगरीत तर प्रमुख प्रदूषण म्हणून सूक्ष्म कण (पी.एम. २.५) हेच आढळले होते.
काय घ्यावी काळजी?
मंडळाच्या निकषांनुसार ० ते ५० चांगली, ५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम, २०१ ते ३०० खराब, ३०१ ते ४०० अतिशय खराब आणि ४०१ ते ५०० गंभीर अशी श्रेणी असते. सध्या नाशिक मध्यम श्रेणीत आहे. म्हणजेच हवा पूर्णपणे स्वच्छ झालेली नाही. मध्यम हवेतही दीर्घकाळ राहिल्यास घसा खवखवणे, डोळे जळजळणे आणि दम लागणे असा त्रास होऊ शकतो. म्हणूनच दमा आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांनी, तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी अजूनही सकाळ-संध्याकाळच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावे आणि गर्दीच्या रस्त्यावर मास्क वापरावा, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी कचरा न जाळणे, बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारून धूळ बसवणे आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे, अशा उपायांचीही गरज व्यक्त होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply