चीनमधील फॅन जुनजी या तरुणाने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी नोकरीतून निवृत्ती घेतल्याने त्याची सगळीकडे चर्चा होत आहे. तो चीनच्या जिलीन भागातला असून, नोकरीसाठी हुनान प्रांतातल्या चांगशा शहरात गेला होता. तिथे त्याने इंटरनेट हेल्थकेअर सेल्समध्ये नोकरी केली. नोकरीत दिवसाचे १८ तास काम करावे लागत होते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त काम, काम आणि काम. बॉसचा ओरडा, टार्गेटचे टेन्शन, झोप नाही, जेवण नाही. शेवटी तो या सगळ्याला इतका वैतागला की त्याने ठरवले, बस झाले, आता नोकरीवर अवलंबून राहायचे नाही.
तीन वर्षांत १४ फ्लॅट
मग त्याने डोके लावले. मोठ्या शहरात महागडे फ्लॅट घेण्यापेक्षा त्याने चांगशा शहरातले जुने, स्वस्त फ्लॅट घ्यायला सुरुवात केली. त्याला माहीत होते, जुने फ्लॅट कमी किमतीत मिळतात. थोडे दुरुस्त केले की ते भाड्याने देता येतात. हाच त्याचा आराखडा होता. त्याने एका जुन्या फ्लॅटसाठी दुरुस्ती धरून ३ लाख युआन म्हणजे आपल्या पैशात साधारण ४२ लाख रुपये खर्च केले. हळूहळू त्याने असे फ्लॅट घेत राहिला. २०२३ ते २०२६ या तीन वर्षांत त्याने एक-दोन नाही, तर तब्बल १४ फ्लॅट घेतले. या १४ फ्लॅटसाठी त्याने २० लाख युआनपेक्षा जास्त, म्हणजे जवळपास ३ लाख डॉलर खर्च केले.
महिन्याला १७,८०० युआन भाडे
त्यातले बरेचसे फ्लॅट चांगशामध्येच आहेत. काही छोटे फ्लॅटही त्याने घेतले. काही फ्लॅट तर त्याला फक्त १.५ लाख युआनला मिळाले. त्याचा एक महागडा फ्लॅट २.४५ लाख युआनचा आहे. त्याने १४ पैकी २ फ्लॅट स्वतःसाठी ठेवले आहेत. बाकीचे १२ फ्लॅट त्याने भाड्याने दिले आहेत. आता हिशोब पाहा. ज्या फ्लॅटला १.५ लाख युआन लागले, त्याचे महिन्याला १७०० युआन भाडे येते. महागड्या फ्लॅटचे २२०० युआन भाडे येते. असे १२ फ्लॅट मिळून त्याला महिन्याला १७८०० युआन भाडे मिळते. वर्षाला हे झाले २.१३ लाख युआन. भारतीय पैशात बोलायचे झालं तर वर्षाला जवळपास २५ लाख रुपये. त्याला काहीही करायची गरज नाही, भाडे आपोआप खात्यात येते.
विचार करा, ज्या वयात लोक नोकरीसाठी धावपळ करतात, त्या वयात हा तरुण निवृत्त झाला आहे. त्याला सकाळी उठून बॉसला उत्तर द्यायची गरज नाही. टार्गेटचे टेन्शन नाही. तो आरामात आयुष्य जगतोय. पण हे इतके सोपे होते का? नाही. त्याने ३ वर्षे दिवसाचे १८ तास काम केले. पैसे साठवले. मग हुशारीने गुंतवले. मोठ्या शहरात दिखाव्यासाठी महागडा फ्लॅट घेण्याऐवजी त्याने स्वस्त फ्लॅटमध्ये पैसा लावला. हाच त्याचा शहाणपणा होता. फॅनची ही गोष्ट आता चीनमध्ये सगळीकडे चर्चेत आहे. लोक म्हणत आहेत, ३० व्या वर्षी निवृत्त होणे खरंच शक्य आहे, फक्त नियोजन पाहिजे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply