सण-उत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागात विशेष तपासणी मोहीम राबवली. १६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत विभागातील तब्बल १२० अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. या कारवाईत ३ कोटी ७८ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा दोन लाख २७ हजार किलोग्रॅम अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये ही तपासणी मोहीम राबवण्यात आली. मिठाई, चिवडा, खाद्यतेल, मसाले, फरसाण, खोया, बटर, पॅक केलेले पिण्याचे पाणी, खवा, मावा आणि भगर अशा विविध अन्नपदार्थांचा साठा या कारवाईत जप्त झाला. त्यामध्ये मसाले, खाद्यतेल, मिठाई आणि फरसाण यांचे प्रमाण सर्वाधिक होते.
तपासणीत काय आढळले?
तपासणीत अनेक आस्थापनांमध्ये अन्नपदार्थांची साठवणूक अस्वच्छ आणि अयोग्य परिस्थितीत होत असल्याचे समोर आले. काही अन्नपदार्थ विहित गुणवत्ता मानकांनुसार नसल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला. लेबलिंगच्या नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने ब्रँडिंग केल्याचेही आढळले. खाद्यतेलाच्या पुन्हा पॅकिंगसाठी वापरलेल्या डब्यांचा बेकायदेशीर पुनर्वापर होत असल्याचे उघड झाले. पॅकिंगवर ‘फोर्टिफाइड ऑइल’ असा दावा करण्यात आला होता, मात्र त्यासाठीचा वैध परवाना आढळून आला नाही. मिठाई तयार करताना विहित मर्यादेपेक्षा जास्त खाद्यरंग वापरल्याचेही निदर्शनास आले.
जिल्हानिहाय कारवाई आणि तक्रारीचे आवाहन
जिल्हानिहाय आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यात ६५, जळगावमध्ये २३, धुळ्यात १३, अहिल्यानगरमध्ये १० आणि नंदुरबारमध्ये नऊ आस्थापनांवर कारवाई झाली. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास नागरिकांनी complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्न व्यावसायिकांनी परवाना घेऊनच नियमांनुसार व्यवसाय करावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply