शहरातील दिवाळी कितीही झगमगाटाची असली तरी ग्रामीण भागातील दिवाळीचा आनंद काही औरच असतो. मातीच्या सुगंधात, माणुसकीच्या उजेडात आणि आठवणींच्या पणत्यांत उजळणारी गावाकडची दिवाळी आठवली की काळजात घालमेल होते. बालपणीचे गाव, मातीचे अंगण, शेणाने सारवलेली घरे, रांगोळ्यांचे रंग, वडीलधाऱ्यांनी स्वतः तयार केलेला आकाशकंदील, उटण्याचा सुगंध, फराळाचा घमघमाट आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माणसामाणसांतील जिव्हाळ्याची नाती — हेच ग्रामीण दिवाळीचे खरे वैभव आहे.
फराळाच्या डब्यात भरलेले प्रेम
ग्रामीण संस्कृतीत दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा सण नसतो, तर नात्यांना उजाळा देणारा, माणसांना एकत्र आणणारा आणि आठवणींची शिदोरी समृद्ध करणारा उत्सव असतो. गावात दिवाळीची चाहूल लागली की घराघरांत लगबग सुरू व्हायची. कुणी घराची साफसफाई करायचे, कुणी अंगण सारवायचे, तर कुणी जुन्या कपड्यांतून नवे काहीतरी शोधायचे. घरातील लहान मुलांना दिवाळीच्या खरेदीचे वेध लागायचे. नवीन कपडे, फटाके, फराळ आणि सुटीत मामाच्या गावाला जाण्याचे स्वप्न त्यांच्या डोळ्यांत चमकायचे.
ग्रामीण दिवाळीत फराळ म्हणजे केवळ खाण्याचे पदार्थ नव्हते, तर प्रेमाची देवाणघेवाण होती. चकल्या, करंज्या, लाडू, अनारसे, शंकरपाळे, चिवडा आणि शेव यांचा सुगंध घराघरांत दरवळायचा. विशेष म्हणजे फराळ तयार झाला की शेजारच्या घरात आणि नातेवाइकांना फराळ पोचल्याशिवाय दिवाळी पूर्ण झाल्यासारखी वाटत नसे. ‘आमच्याकडचे लाडू चाखून बघा!’ असे म्हणत डबा देणारी काकू आणि ‘तुमच्या करंज्या तर अगदी भारी झाल्यात!’ असे कौतुक करणारी शेजारीण, या संवादांतून नात्यांचा गोडवा अधिकच वाढायचा. एका घरातून चिवडा आला की दुसऱ्या घरातून लाडू, तिसऱ्या घरातून करंज्या, चौथ्या घरातून शंकरपाळे — शेवटी प्रत्येक घरात फराळाचे इतके डबे जमा व्हायचे की घरातील मंडळी म्हणायची, ‘दिवाळी संपली तरी फराळ संपणार नाही बहुतेक!’
‘इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे’ हे वाक्य बहीण ओवाळताना पुटपुटायची. त्यावेळी ऐकलेल्या वाक्याचा अर्थ मोठे झाल्यावर उमगला. बळिराजा प्रती असलेली कृतज्ञता ग्रामीण भागात आजही कायम आहे. भाऊबीजेचा ओलावा आणि बहिणीच्या ओवाळणीतील प्रेम चिरंतर आहे. ग्रामीण दिवाळीतील सर्वात हृदयस्पर्शी क्षण म्हणजे भाऊबीज. लग्न होऊन सासरी गेलेली बहीण भाऊबीजेला माहेरी येते, तेव्हा घरातील वातावरणच बदलून जाते. भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा, ओवाळणीचे ताट, बहिणीच्या डोळ्यांतील प्रेम आणि भावाच्या हातातील भेट — या सगळ्यांत एक वेगळाच भावनिक ओलावा असतो. कधी भाऊ उशिरा आला की बहीण रुसून बसायची. ‘आता ओवाळणारच नाही!’ अशी धमकी द्यायची. पण, भाऊ दोन गोड शब्द बोलला आणि एखादी छोटीशी भेट दिली की रुसवा क्षणात विरघळायचा. शेवटी ओवाळणी झाल्यावर बहिणीच्या हातचे लाडू खाताना भाऊ म्हणायचा, ‘अगं, पुढच्या वर्षी जरा मोठे लाडू कर!’ आणि त्यावर बहिणीचे उत्तर तयार असायचे, ‘आधी भेट मोठी आण, मग लाडूही मोठे मिळतील!’
शेताच्या बांधावरची दिवाळी
ग्रामीण दिवाळीचा एक वेगळाच पैलू म्हणजे शेतकरी कुटुंबांचा आनंद. वर्षभर शेतात राबणारे हात दिवाळीच्या दिवसांत थोडे निवांत व्हायचे. गोधनाची पूजा, बैलांची सजावट, गोवर्धन पूजा, घरातील जनावरांना गोडधोड खाऊ घालणे, तोरण आणि हार लावणे, अंगणात रांगोळी काढणे, किल्ला तयार करणे, पाच पांडव तयार करणे आणि देवापुढे दिवा लावणे — या परंपरांतून शेती, पशुधन आणि निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ व्हायचे. गावातील एखाद्या घरात आर्थिक अडचण असेल, तर शेजारी मदतीला धावून यायचे. कुणी फराळ द्यायचे, कुणी मुलांसाठी कपडे आणायचे, तर कुणी दिवाळीचा किराणा पोचवायचे. अशा वेळी कुणी उपकाराची भाषा करायचे नाही. उलट, ‘अहो, आपल्याच घरातले आहेत!’ असे सहज म्हणायचे.
दिवाळीच्या रात्री अंगणात बसून आजीच्या गोष्टी ऐकण्याची मजा काही औरच होती. रामायण, महाभारत, राजा-राणी, भुताखेतांच्या गोष्टी आणि गावातील जुन्या आठवणी — आजीच्या शब्दांतून एक वेगळे विश्व उभे राहायचे. आजोबा आपल्या काळातील दिवाळी सांगायचे. ‘आमच्या वेळी फटाके कुठे होते? आम्ही मातीचे दिवे लावायचो. घरच्या घरी फराळ व्हायचा. सगळे एकत्र बसून जेवायचो!’ मग एखादा नातू विचारायचा, ‘आजोबा, तुमच्या वेळी मोबाइल नव्हता, मग तुम्ही दिवाळीचे फोटो कसे काढायचे?’ आणि आजोबा हसत म्हणायचे, ‘आम्ही फोटो मनात काढायचो, म्हणून ते अजूनही जपून ठेवलेत!’
बदलत्या काळात ग्रामीण दिवाळी बरीचशी हरवली आहे. तिला शहरी दिवाळीचा आधुनिक स्पर्श झाला आहे. मोबाइल, सोशल मीडिया, महागड्या भेटवस्तू, रेडीमेड फराळ आणि इलेक्ट्रिक रोषणाई यांचा प्रभाव वाढला आहे. एकत्र बसून गप्पा मारण्यापेक्षा संदेश पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी शेजारीपाजारी दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला घरोघरी जायचे आणि वडीलधाऱ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचे. आता एका क्लिकवर शुभेच्छा दिल्या जातात. तरीही ग्रामीण दिवाळीतील मातीचा सुगंध, नात्यांचा गोडवा, शेजाऱ्यांतील आपुलकी आणि सामूहिक आनंद आजही टिकून आहे. कारण गावातील दिवाळीचा खरा प्रकाश विजेच्या दिव्यांत नसून माणसांच्या मनांत आहे. एकमेकांच्या सुखदुःखांत सहभागी होणे, रुसवेफुगवे विसरणे, नात्यांना जपणे, आनंद वाटून घेणे आणि गरजूंच्या घरातही दिवा पेटवणे — हीच दिवाळीची खरी शिकवण आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply