पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे उत्तम प्रशासक, न्यायप्रिय राज्यकर्त्या, कुशल मुत्सद्दी आणि बारव, मंदिर-घाटांची निर्मिती व जीर्णोद्धार करणाऱ्या धर्मपरायण राजमाता, अशी त्यांची ओळख सर्वपरिचित आहे. मात्र या सर्व कर्तृत्वाच्या मुळाशी असलेले त्यांचे विद्याप्रेम, वाचनाची आवड आणि ग्रंथप्रेम हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तितकाच महत्त्वाचा पण तुलनेने कमी चर्चिला गेलेला पैलू आहे. राज्यकारभार, युद्धमोहिमा, न्यायनिवाडे आणि लोककल्याणकारी कामांच्या प्रचंड व्यापातही ज्ञानार्जनाची ओढ जपणाऱ्या त्या असामान्य राज्यकर्त्या होत्या. त्यांच्या जीवनाकडे पाहताना ‘एका हाती तलवार आणि दुसऱ्या हाती पुस्तक’ हे वर्णन सार्थ ठरते.
शिक्षणाची सुरुवात आणि राजधानी महेश्वर
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म ३१ मे १७२५ रोजी बीड जिल्ह्यातील चौंडी येथे झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे यांनी त्या काळातील सामाजिक परिस्थितीचा विचार करता मुलीच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. त्यांना वाचता-लिहिता यावे, यासाठी वडिलांनीच शिक्षण दिल्याचा उल्लेख देवी अहिल्या विद्यापीठाच्या चरित्रविषयक माहितीत आढळतो. पुढे होळकर घराण्यात आल्यानंतर मल्हारराव होळकर यांच्यासारख्या अनुभवी सेनानी आणि प्रशासकाचा सहवास त्यांना लाभला. राजकारण, प्रशासन, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि धर्म-संस्कृती यांचे प्रत्यक्ष ज्ञान त्यांनी आत्मसात केले. अहिल्यादेवींनी महेश्वरला राजधानी केल्यानंतर या नगरीला केवळ राजकीय आणि प्रशासकीय केंद्र म्हणून विकसित केले नाही, तर कला, साहित्य, संस्कृती आणि विद्वत्तेचे केंद्र बनविण्याचाही प्रयत्न केला.
हस्तलिखित ग्रंथांचा संग्रह
त्या काळात आजच्यासारखी छपाईची साधने सहज उपलब्ध नव्हती. ग्रंथांची निर्मिती आणि जतन करण्यासाठी हस्तलिखितांवर अवलंबून राहावे लागे. अशा परिस्थितीत विविध ठिकाणांहून ग्रंथ मिळविणे, त्यांच्या प्रती तयार करून घेणे आणि त्यांचे जतन करणे हे मोठे काम होते. अहिल्यादेवींच्या संग्रहात शेकडो हस्तलिखित धर्मग्रंथ असल्याचे उल्लेख आढळतात. काही ग्रंथ महाराष्ट्रातील चांदवड येथून मागविल्याच्या नोंदीही सांगितल्या जातात. त्यांच्या संग्रहातील ग्रंथांचे वाचन, पारायण आणि श्रवण नियमितपणे होत असे. त्यांच्या ग्रंथसंग्रहात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य, श्रीधरी, गीतगोविंद, चित्रषष्ठीमीमांसा आणि कान्यकुब्ज माहात्म्य अशा महत्त्वाच्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. धर्मशास्त्र, महाभारत, रामायण, पुराणे, संतसाहित्य, काव्य आणि ज्योतिष अशा विविध ज्ञानशाखांशी त्यांचा परिचय होता.
विद्वानांचा सन्मान आणि साहित्यनिर्मिती
महेश्वरच्या दरबारात देशाच्या विविध भागांतून विद्वान, पंडित, शास्त्री आणि साहित्यिक येत असत. अहिल्यादेवी त्यांना योग्य तो मानसन्मान देत असत. ग्रंथालयाशी संबंधित नोंदींमध्ये मल्हारभट्ट मुळ्ये, जानोबा पुराणिक, रामचंद्र रानडे, काशीनाथ शास्त्री, मनोहर बर्वे, बलिरामजी, गणेशभट्ट, त्र्यंबकभट्ट, महंत सुजानगिरी गोसावी, गोविंदराम पांडे आणि दाजी रघुनाथ यांसारख्या विद्वानांची नावे आढळतात. मराठी साहित्यविश्वातील कवी मोरोपंत आणि शाहीर अनंत फंदी यांचाही अहिल्यादेवींनी आदर-सत्कार केला होता. शाहीर अनंत फंदी हे लावणी, पोवाडे आणि फटके या काव्यप्रकारांसाठी प्रसिद्ध होते. अहिल्यादेवींच्या प्रेरणेने आणि आश्रयाने पंडित खुशालीराम राय शास्त्री यांनी ‘अहिल्याकामधेनु’ नावाचा धार्मिक, विधी आणि न्यायशास्त्रावरील मोठा संस्कृत ग्रंथ लिहिला. त्यांनी राजधानी इंदूरहून महेश्वर येथे हलवली आणि तेथे जुन्या हस्तलिखितांचे जतन करण्यासाठी एक मोठे ग्रंथालय (पोथीखाना) उभारले. होळकर दप्तरातील मूळ मोडी पत्रांच्या अभ्यासातून अहिल्याबाईंनी केवळ मराठीच नव्हे, तर संस्कृत आणि हिंदी (ब्रजभाषा) साहित्यालाही प्रोत्साहन दिल्याचा पुरावा मिळतो. काशी, जगन्नाथपुरी आणि पंढरपूर येथील अनेक संस्कृत पंडितांना दरवर्षी विद्वानांची सभा भरवून दक्षिणा आणि वर्षासने सुरू केली. आजच्या काळात वाचनसंस्कृती, ग्रंथालये आणि वैचारिक संवाद यांविषयी चर्चा होत असताना अहिल्यादेवींचे ग्रंथप्रेम विशेष प्रेरणादायी ठरते. म्हणूनच त्यांचे स्मरण करताना त्यांच्या हातातील शिवलिंग आणि तलवारीसोबतच त्यांच्या ग्रंथसंग्रहाचीही आठवण ठेवली पाहिजे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply