शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

परभणीत दिवाळी: प्रकाशाचा सण, संस्कृतीचे संवर्धन

परभणीत दिवाळी केवळ दिवे आणि फराळापुरती मर्यादित नाही; ती संस्कृती, परंपरा आणि मूल्ये जपण्याची संधी आहे. स्वच्छता, रांगोळी आणि फराळातून कुटुंब एकत्र येते.

परभणीत दिवाळी: प्रकाशाचा सण, संस्कृतीचे संवर्धन

दिवाळी हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक मोठा आणि आनंदाचा सण आहे. हा सण केवळ दिव्यांची रोषणाई, फराळ आणि फटाक्यांपुरता मर्यादित नाही; आपली संस्कृती, परंपरा आणि मूल्ये जतन करण्याची ती एक सुंदर संधी असते. दिवाळीच्या तयारीत घराची स्वच्छता, जुन्या वस्तूंची आवराआवर, नवीन वस्तूंची खरेदी, आकाशकंदील बनवणे किंवा आवडीचे आकाशकंदील खरेदी करणे या गोष्टी लहानांच्या मनावर संस्कार करतात, तर मोठ्यांचे संस्कार काळानुरूप अधिक दृढ करतात.

कुटुंबाला बांधणाऱ्या परंपरा

‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ म्हणत घराची स्वच्छता करताना घरातील लहानथोर सर्वजण हातभार लावतात. त्यातून होणारे संवाद, जवळीक आणि एकमेकांची काळजी कुटुंबाला घट्ट बांधून ठेवते. स्वच्छता करताना जुन्या आठवणी जाग्या होतात आणि दूर गेलेली मने पुन्हा एकत्र येतात. घर व परिसराची स्वच्छता, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी आणि पारंपरिक फराळ या प्रथा आजही मोठ्या उत्साहाने पाळल्या जातात. मोठ्यांचा आशीर्वाद घेणे, नातेवाईक व मित्रांना भेटणे, एकमेकांकडे फराळाला जाणे आणि गरजू व्यक्तींना मदत करणे यामुळे प्रेम आणि आपुलकी वाढते, तसेच सामाजिक बांधिलकीची भावनाही रुजते. स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या मातीच्या पणत्या आणि सजावटीच्या वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देता येते. पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करून संस्कृतीसोबत निसर्गाचेही संवर्धन करता येते.

मराठवाड्यातील दिवाळीची वेगळी ओळख

मराठवाड्यात दिवाळीची खरी सुरुवात वसुबारसेने होते. शेतकरी आपले मित्र असणाऱ्या गाय-वासरांची मनोभावे पूजा करतात. ‘दिन-दिन दिवाळी, गायी-म्हशी ओवाळी’ हे गीत प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात रुजलेले आहे. मराठवाड्यातील शेतकरीवर्गासाठी नवीन आलेले पीक आणि धान्य हेच खरे धन असते. धनत्रयोदशी आणि पाडव्याला नवीन धान्याची व शेतीच्या अवजारांची पूजा केली जाते. किल्ला बांधणे आणि पांडवांची पूजा हीदेखील श्रद्धेने केली जाते. अतिवृष्टी किंवा दुष्काळाचे संकट असले, तरीही मराठवाड्यातील शेतकरी सर्व दुःख विसरून अत्यंत जिद्दीने व उत्साहात दिवाळी साजरी करतात. धनत्रयोदशीपासून खरी दिवाळीची लगबग सुरू होते. अंगणात सुंदर रांगोळ्या, दारात आकाशकंदील आणि पणत्यांची आरास रंगते. अभ्यंगस्नानासाठी तिळाचे उटणे, सुगंधी तेल आणि गरम पाण्याची तयारी केली जाते. पूर्वी पहाटे भूपाळ्यांच्या गीतांनी सकाळ व्हायची आणि सकाळी सहा वाजता रेडिओवरील सुप्रभाताने दिवस सुरू व्हायचा. पणत्यांचा मंद प्रकाश, फराळाचा सुगंध, आकाशकंदील आणि रांगोळी यांतून दिवाळी एक सुंदर संदेश देते — जसा दिवा अंधार दूर करतो, तसेच प्रेम, माणुसकी आणि सकारात्मक विचार आपल्या जीवनातील दुःख व निराशा दूर करू शकतात.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance