जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात शनिवारी पहाटे एका घराला आग लागली. अतिरिक्त वीजभारामुळे फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात आले. आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
वृद्ध दाम्पत्याला सुरक्षित बाहेर काढले
राजेश सिंधी हे कुटुंबीयांसह सिंधी कॉलनीत राहतात. शनिवारी (ता. ७) पहाटे एकच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात अचानक फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन आग लागली. आग लागली तेव्हा वयोवृद्ध दाम्पत्य घरातच होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील तरुणांसह सुरेश पंजाबी यांनी मदतीला धाव घेतली. घराचे दार तोडून वृद्ध दाम्पत्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र घरातील सर्व साहित्य आणि विद्युत जोडणीची वायरिंग जळून खाक झाली.
नुकसानभरपाईची मागणी
वीजभाराचे नियमन करण्यात वीजमंडळ अपयशी ठरले असून शहरातील अनेक रहिवासी वस्त्यांमध्ये कमी-जास्त अनियमित पद्धतीने विजेचा पुरवठा होतो, असा आरोप वृद्ध दाम्पत्याने केला आहे. अतिरिक्त भाराचा पुरवठा झाल्यामुळेच फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट घडून घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याची सर्वस्वी जबाबदारी वीजमंडळाची असून त्वरित नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply