दिवाळी म्हटली की पहाटेचे अभ्यंगस्नान, पारंपरिक फराळ आणि मंदिरांतील दर्शन असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र बदलत्या काळानुसार दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीतही बदल होत आहे. आता दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमांमध्ये तरुणाईचा उत्साह विशेष आकर्षण ठरत आहे. संगीत, ढोल-ताशांचा गजर, लाइव्ह बँड, डीजे आणि समाजमाध्यमांसाठी रील्सच्या माध्यमातून जेन-झी आणि युवा पिढी दिवाळी पहाटेचा आनंद लुटण्यासाठी सज्ज झाली आहे.
रविवारी (ता. ८) ठाणे शहरात विविध ठिकाणी दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यंदाची दिवाळी पहाट तरुणाईच्या जल्लोषाने गाजणार आहे. ठाणेकरांचे आकर्षण असलेल्या मासुंदा तलाव परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्था आणि मंडळांच्या वतीने दिवाळी पहाट साजरी केली जाणार आहे.
शहरभर सांगीतिक कार्यक्रमांची रेलचेल
शिवसेना शिंदे गट तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जांभळी नाका, राम मारुती रोड आणि विष्णुनगर परिसरातही सांस्कृतिक आणि सांगीतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या वतीने जांभळी नाका परिसरात संगीत, वाद्यवृंद आणि ढोल-ताशा पथकाच्या गजरात दिवाळी पहाट साजरी केली जाणार आहे. या कार्यक्रमाला तरुणाईचा विशेष प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. डॉ. राजेश मढवी यांच्या पुढाकाराने दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी एका अनोख्या दिवाळी पहाटेचे आयोजन करण्यात येत आहे.
लालबागबीट्स आणि भव्य कार्निव्हल
नितीन लांडगे फाउंडेशनच्या वतीने जेन-झी दिवाळी पहाट आणि युवा जल्लोष आयोजित केला आहे. रविवारी सकाळी ६.३० वाजता तलावपाळी येथील राजवंत ज्वेलर्स परिसरात लालबागबीट्स सादरीकरण करणार आहेत. संगीताच्या तालावर तरुणाईला थिरकवण्यासोबतच या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीही जपली जाणार आहे. उपवन तलाव येथे ११ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी वंडरलैंड या कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. ५० हून अधिक कलाकारांचे सादरीकरण, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजक स्पर्धा, फोटोग्राफी आणि रील मेकिंग स्पर्धा ही याची प्रमुख आकर्षणे आहेत. या कार्निव्हलमध्ये रविवारी सकाळी ६.३० वाजता विशेष दिवाळी पहाट रंगणार आहे. गायमुख चौपाटी येथेही रविवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत ठाणेकर दिवाळी पहाट आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये रिदम्स अँड मेलडी ब्रास बँड, मराठमॉक्स मराठी रॉक बँड, ढोल-ताशा पथक आणि लाईव्ह डीजेच्या तालावर ठाणेकरांना संगीताची मेजवानी अनुभवता येणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply