बांबू लागवड आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन उत्पन्नाचे साधन ठरू शकतो. व्हीबीजी रामजी योजनेतून अडीच एकर क्षेत्रावर बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सात लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. बांबू उद्योगाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी सांगितले.
मुरूड तालुक्यातील शिरगाव येथे ग्रीन केन बांबू वर्ल्ड असोसिएशनच्या सामाईक सुविधा केंद्राचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, तहसीलदार आदेश डफळे आणि सभापती निलेश घाटवळ उपस्थित होते.
अनुदान आणि उत्पादनाची संधी
बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना चार वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने सात लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. चार ते पाच वर्षांनी बांबूची कापणी करता येते. त्यापासून ग्लास, पेन, टूथब्रश, कंगवे, खुर्च्या आणि सजावटीच्या वस्तू तयार करता येतात. सुविधा केंद्रामुळे कारागिरांना आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध होऊन उत्पादनांना मूल्यवर्धन करता येईल. टिश्यू कल्चर प्रयोगशाळेसाठी ५० लाख रुपयांच्या मदतीबाबतही सकारात्मक विचार केला जाईल, असे गोगावले यांनी सांगितले.
जिल्ह्यात बांबू लागवडीचा विस्तार
जिल्ह्यात आतापर्यंत ३२ लाख बांबू रोपांचे वितरण झाले असून ८११ ग्रामपंचायतींमध्ये लागवड करण्यात आली आहे. सुविधा केंद्रासाठी आठ कोटी दहा लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. स्थानिक उत्पादनाला चालना मिळाल्यास बांबू उद्योगातून ग्रामीण भागात रोजगार आणि उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply