सोलापूर येथील नू. म. वि. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण टाळून यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याचा संकल्प केला आहे. प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ घेत विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. बुधवारी, ४ नोव्हेंबर रोजी शाळेत दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला.
सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. श्रद्धा करकमकर-पांढरे, कमल स्वामी, मुख्याध्यापिका स्मिता माळवदकर, सदस्य सुरेश मंकणी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ॲड. मोनिका दामले यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. रेणुका हिरेमठ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पाहुण्यांच्या हस्ते पणत्या प्रज्वलित करून किल्ल्याचे पूजन करण्यात आले.
नृत्य, नाट्य आणि पुस्तक वाटप
इयत्ता पहिलीच्या (बकुळ) विद्यार्थिनींनी ‘हसू, नाचू, गाऊ आली दिवाळी’ या गीतावर नृत्य सादर केले. त्यांना सुवर्णा दुधाळ यांचे मार्गदर्शन लाभले. सविता नवगिरे यांनी विद्यार्थ्यांसह दिवाळीच्या सहा दिवसांचे नाट्यरूप सादरीकरण केले. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ आणि ‘दिवाळी सुट्टीतील आनंददायी अभ्यास’ या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. जून ते ऑक्टोबर या कालावधीत वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. शिक्षकांनाही शाळेतर्फे दिवाळी भेट देण्यात आली. संगीता बिराजदार यांनी सूत्रसंचालन केले, तर रोहिणी चौधरी यांनी आभार मानले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply