राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन पवारांची भेट घेतली. यावेळी रुग्णालयात शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यादेखील उपस्थित होत्या. प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतल्यानंतर रुग्णालयाबाहेर येत पत्रकारांना पवारांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?
पटेल यांनी सांगितले की, शरद पवार यांना थकवा जाणवत असल्याने त्यांना पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर ते मुंबईत आले. इथे त्यांची तब्येत ठीक आहे. सामान्यपणे वर्षातून एक-दोनदा पूर्ण तपासणी व्हावी, याच उद्देशाने ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची तब्येत चांगली असल्याचे पटेल यांनी सांगितले.
पटेल म्हणाले की, त्यांची चांगली प्रकृती पाहून मलाही बरे वाटले. शरद पवार देखील चांगल्या मूडमध्ये होते. देशाच्या राजकारणात काय सुरू आहे, याबाबत त्यांना रुची असल्याने ते विचारत होते. खूप चांगली चर्चा झाली. एक-दोन दिवसांत तपासणी पूर्ण झाल्यानंतर ते घरी जातील आणि त्यांना आराम मिळेल, अशी माहिती पटेल यांनी दिली.
पवार त्यांच्या शैलीत हसत होते
शरद पवारांची तब्येत एकदम चांगली आहे, काहीच अडचण नाही, उत्तम तब्येत आहे, असेही पटेल यांनी सांगितले. साहेब त्यांच्या शैलीत हसत होते. राजकारणात काय चालले आहे, असे विचारत होते. सर्वसाधारणपणे काय चालले आहे, याविषयी चर्चा झाली, असे पटेल म्हणाले.
चर्चेबाबत विचारले असता पटेल म्हणाले की, ते शरद पवारांना नेहमीच भेटत असतात. सात-दहा दिवसांत काही घडले म्हणून हा प्रश्न विचारला जात आहे, असे नाही. सुप्रिया सुळे दिल्लीत त्यांच्यासोबत असतात. त्यांचे नेहमीच कौटुंबिक संबंध राहिले आहेत आणि ते राहणारच, असेही पटेल म्हणाले.
भुजबळ आणि विश्वजीत कदम यांनीही घेतली भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील गुरुवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी शरद पवारांची भेट घेतली. विश्वजीत कदम आणि शरद पवार यांच्या रुग्णालयातील भेटीचा फोटोही समोर आला आहे. यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply