मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात एका ऐतिहासिक घराच्या खोलीतील जमीन अचानक खचली. त्यानंतर सुमारे १५ फूट खोल खड्डा तयार झाला. यावेळी खोलीतील पलंगावरची चादर बदलणारी ४५ वर्षीय महिला त्याच खड्ड्यात पडली. त्यानंतर तेथे ऐतिहासिक ठेवा असल्याचे समोर आले.
ही घटना रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली. जमीन खचलेले घर मुलींची शाळा असलेल्या गल्लीत आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने शिडीचा वापर करून तिला खड्ड्यातून बाहेर काढले. महिलेला किरकोळ दुखापत झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.
घरामागचा ऐतिहासिक संदर्भ
महिला वास्तव्यास असलेले ऐतिहासिक घर एकेकाळी सिंधिया घराण्याचे प्रशासकीय कोर्ट होते. याच कोर्टाच्या एका जुन्या कक्षाच्या वर हे घर बांधण्यात आले आहे. सिंधिया घराण्याचे राज्य असताना या वास्तूचा वापर कराच्या रूपात जमा करण्यात आलेले धान्य साठवण्यासाठी केला जायचा. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधिया घराण्याचे राज्य असताना या भागात स्थानिक प्रशासकीय कोर्ट होते. इथून महसूल वसुली आणि प्रशासकीय काम चालायचे. जमिनीखालील तळघराच्या एका भागात कराच्या रूपात गोळा केलेले अन्न ठेवले जायचे. त्याला स्थानिक भाषेत ‘गल्ला खंती’ असे म्हटले जाते. बुधवारी खचलेला भाग त्याच जुन्या स्थापत्याचा भाग असण्याची शक्यता आहे.
खड्डा कसा निर्माण झाला?
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पणजोबा पंडित मदन मोहन मिश्रा हे सिंधिया संस्थानात मानद मॅजिस्ट्रेट होते. त्यांच्याकडे खंडेश्वर महादेव मंदिराशी संबंधित कामांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. १९८० च्या दशकात घराची पुनर्बांधणी करण्यात आली. त्यावेळी हा खड्डा बंद करण्यात आला होता. वर्षानुवर्षे पाणी झिरपत राहिल्याने बंद केलेल्या भागातील माती हळूहळू वाहून गेली असावी आणि त्यामुळेच फरशीखाली पोकळी निर्माण झाली असावी, अशी शक्यता आहे. खड्ड्याच्या खालील भागात पाणीही सापडले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply