जळगाव येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मित्रपक्षांसोबत युती करण्यास अनुकूल असल्याचे संकेत दिले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून छाननीदरम्यान झालेल्या घडामोडींमुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. असे असताना महाजन यांनी युतीबाबत सकारात्मक भूमिका मांडली. एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी मतदारसंघ व जागेनिहाय उमेदवारी आणि विजयी होण्याच्या शक्यतेचा आढावा घेतला.
मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी व चंद्रकांत बाविस्कर, दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते. सुरुवातीला जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बँक निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कशा स्वरूपाचे नियोजन करता येईल, याबाबत चर्चा झाली.
जागेनिहाय आढावा
महाजन यांनी सोसायटी मतदारसंघ, महिला राखीव जागा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आदी गटनिहाय जागांवरील उमेदवारांसंदर्भात आढावा घेतला. प्रत्येक मतदारसंघात आपली मते किती आहेत आणि निवडून येण्याची शक्यता किती, याबाबत त्यांनी प्रश्न विचारले व माहिती जाणून घेतली.
मित्रपक्षांना सोबत घेणार
जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी बँकेवर असणे अपेक्षित असून, त्यादृष्टीने आम्ही आमचे उमेदवार देणार आहोत, असे महाजन यांनी स्पष्ट केले. काही तालुक्यांच्या ठिकाणी मित्रपक्ष प्रभावी आहेत, तर काही तालुक्यांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. ते डोळ्यासमोर ठेवून मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवू, असे त्यांनी सांगितले.
पाचोऱ्याचे शिवसेना आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमीत पाटील यांचा अर्ज बाद ठरविल्याने शिवसेनेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र, महाजनांनी याबाबत स्पष्ट करताना अर्ज बाद होण्यात कुणाचाही काहीही हस्तक्षेप नसून, तांत्रिक कारणांमुळे तो बाद झाल्याचे सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply