ठाणे रेल्वे स्थानकातील स्वच्छतेची जबाबदारी आता डी मार्ट फाउंडेशन घेणार आहे. स्थानकातील सर्व फलाटांची साफसफाई या संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे. संघटनेच्या सीएसआर निधीतून फलाट क्रमांक दोनवर उभारण्यात आलेले मोफत शौचालय गुरुवारी, पाच नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहे. त्याचबरोबर फलाट क्रमांक पाच आणि सहा वरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी सीएसएमटी दिशेकडील पादचारी पुलावर नव्या एस्केलेटरची सुविधाही सुरू करण्यात आली आहे. खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते या दोन्ही सुविधांचे लोकार्पण गुरुवारी झाले.
गर्दीच्या वेळी फलाट पाच-सहावर ताण
ठाणे स्थानकात लोकलच्या गर्दीबरोबरच मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळी फलाट क्रमांक पाच आणि सहावर प्रवाशांची मोठी गर्दी होते. विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून सामानासह चढ-उतार करताना ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांची गैरसोय होत होती. ही समस्या लक्षात घेऊन खासदार नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर पादचारी पूल क्रमांक एक येथे नवीन एस्केलेटर उभारण्यात आला आहे.
मोफत शौचालयात चोवीस तास कर्मचारी
डी मार्ट फाऊंडेशन आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त उपक्रमातून फलाट क्रमांक दोनवर मोफत शौचालय उभारण्यात आले आहे. या शौचालयात चोवीस तास स्वच्छता कर्मचारी उपलब्ध असणार आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply