दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. मात्र वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणासह आरोग्याचाही प्रश्न गंभीर होत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील निमगुळ गावात शाळकरी मुलांनी फटाके न वाजवता प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.
निमगुळ येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनच्या विद्यार्थ्यांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थ्यांसह शिक्षकही सहभागी झाले होते.
फटाक्यांचे दुष्परिणाम समजावले
समितीचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फटाक्यांमुळे होणाऱ्या वाढत्या दुष्परिणामांची माहिती दिली. फटाके टाळून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वाचलेले पैसे पुस्तकांसाठी वापरा
प्राचार्य एस. एम. भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फटाक्यांवर होणारा खर्च टाळून वाचलेल्या पैशांतून चांगली पुस्तके खरेदी करण्याचा, खेळणी घेण्याचा, नवीन छंद जोपासण्याचा आणि गरजूंना मदत करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्राचार्य भावसार, मुख्याध्यापक उमेश सांगळे, पी. पी. अहिराव, किशोर पिसे, सीमा दराडे, सी. एन. नगराळे, एस. व्ही. भदाने, ए. एन. साळुंखे, एम. एस. अहिरे, एम. एम. देसले, जी. डी. पाटील, सी. ए. पवार आणि पी. बी. साळी आदी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply