दिवाळीच्या निमित्ताने लिंगायत शरण फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी, ६ नोव्हेंबर रोजी लातुरात बसव-देशीकेंद्र स्वरमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जगद्गुरू महात्मा बसवेश्वर यांचे समतावादी विचार, देशीकेंद्र महाराजांचे आध्यात्मिक मार्गदर्शन आणि शरण संस्कृतीचा अनमोल वारसा सुरेल स्वरांच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोचविणे, हा या स्वरमहोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने भाव, भक्ती आणि संगीत यांचा त्रिवेणी संगम अनुभवण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. उत्तमोत्तम भक्तिगीते, भावपूर्ण स्वररचना आणि सुरेल संगीताच्या माध्यमातून आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेता येणार आहे. हा स्वरमहोत्सव महात्मा बसवेश्वर महाविद्यालय येथे सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत होणार आहे.
कलाकार आणि साथसंगत
या महोत्सवात गायक प्रा. विजयकुमार धायगुडे, दीपिकाताई गीते-डिंगोळे आणि भार्गवी काशीद हे गायन सादर करणार आहेत. त्यांना संवादिनीवर गणेश सुतार व संतोष थोरात, तबल्यावर प्रा. परमेश्वर पाटील, पखवाजवर महेश वंगवाड आणि तानपुरावर प्रा. कल्याण पाटील साथसंगत करणार आहेत.
मान्यवरांची उपस्थिती आणि सत्कार
यावेळी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, पोलिस उप अधीक्षक समीरसिंह साळवे, राम बोरगावकर, तुकाराम पाटील, डॉ. योगानंद दडगे, शिरीष उटगे, सुनील मिटकरी, प्रदीप दिंडेगावे, विश्वनाथ निगुडगे आणि डॉ. सिद्राम डोंगरगे उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे, जिल्हा कोषागार अधिकारी उज्ज्वला भाऊसाहेब पाटील आणि रामदास भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या स्वरमहोत्सवास शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लिंगायत शरण फाउंडेशनचे अध्यक्ष व महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांनी केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply