अलिबाग-रोहा मार्गावर कुरूळ तलाव ते बेलकडे फाटा या टप्प्यात सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वीच्या कामात दीड ते दोन फूट खोदाई केली जात होती; मात्र सध्याच्या कामात खोदाईची खोली कमी असल्याने रस्ता पुन्हा खचण्याची आणि खड्डे पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडी
ऐन दिवाळीत हे काम सुरू असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावी येणाऱ्या नागरिकांची आणि खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत. सुट्टीच्या काळात पर्यटकांचीही मोठी वाहतूक होणार असल्याने कोंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षभरापासून काँक्रीटीकरणाची कामे
गेल्या वर्षभरापासून तालुक्यात विविध ठिकाणी काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. अलिबाग-रोहा मार्गावरील बेलकडे ते सहाणपर्यंतचा रस्ता यापूर्वी बांधण्यात आला होता; मात्र काम पूर्ण होण्यापूर्वीच त्यावर मोठे खड्डे पडल्याने रस्ता फोडून पुन्हा बांधण्याची वेळ आली. आता उर्वरित कुरूळ तलाव ते बेलकडे फाटा या मार्गाचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. खोदाईनंतर खडीकरण केले जात असले तरी त्याची खोली कमी असल्याने टिकाऊपणाबाबत शंका व्यक्त होत आहे.
एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलकडे ते कुरूळ हा मार्ग अरुंद असून वाहनांची वर्दळ मोठी आहे. अधिक खोदाई केल्यास कामाला विलंब होऊन नागरिकांना जास्त दिवस कोंडीचा त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे खोदाई कमी करण्यात आली असून, सर्वेक्षणानुसारच काम सुरू आहे. पुढील पाच वर्षे देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराची राहणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply