नियमित व्यायाम असो वा डाएट, पोटावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. मात्र, वजन कमी करण्यासाठी केवळ व्यायाम आणि आहारावर लक्ष देऊन चालत नाही, तर सकाळच्या रूटीनमध्ये काही चांगल्या सवयींचा समावेश करणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यानंतर आपण काय करतो, याचा परिणाम दिवसभरातील ऊर्जा, झोप आणि आरोग्यावर होऊ शकतो. सकाळच्या काही सवयी शरीर सक्रिय ठेवण्यास, तणाव कमी करण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात.
दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करा
रात्रीच्या झोपेनंतर शरीराला पाण्याची गरज असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. अनेकदा शरीराला पाण्याची गरज असतानाही आपल्याला भूक लागल्यासारखे वाटते. अशावेळी पुरेसे पाणी प्यायल्याने विनाकारण खाणे टाळता येऊ शकते. दिवसभरही नियमित पाणी पिण्याकडे लक्ष द्या.
कोवळ्या उन्हात वेळ घालवा
सकाळचा नैसर्गिक सूर्यप्रकाश शरीरासाठी फायदेशीर असतो. दररोज सकाळी साधारण १० ते १५ मिनिटे कोवळ्या उन्हात वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीराचे सर्केडियन रिदम नियमित राहण्यास मदत होते. याचा सकारात्मक परिणाम झोपेच्या वेळेवर आणि गुणवत्तेवर होऊ शकतो. वजन नियंत्रणासाठी पुरेशी आणि शांत झोप घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
वेगाने चालण्याचा व्यायाम करा
वजन कमी करण्यासाठी नियमित शारीरिक हालचाल करणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर २० ते ३० मिनिटे वेगाने चालण्याचा व्यायाम करा. यामुळे शरीर सक्रिय राहते आणि कॅलरी बर्न होण्यास मदत होते. तसेच नियमित चालण्यामुळे हृदयाचे आरोग्य आणि शारीरिक क्षमता सुधारण्यास मदत मिळते. सुरुवातीला कमी वेळ चालून हळूहळू व्यायामाचा कालावधी वाढवा.
दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा
सततचा तणाव वजन नियंत्रणात अडथळा ठरू शकतो. तणावामुळे शरीरात कॉर्टिसोल या हार्मोनची पातळी वाढू शकते. त्यामुळे सकाळी काही मिनिटे शांत बसून दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा. श्वास हळूहळू आत घेणे आणि बाहेर सोडणे यावर लक्ष केंद्रित करा. यामुळे मन शांत राहण्यास, तणाव कमी होण्यास आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने करण्यास मदत होते.
नाश्त्यात प्रोटीनचा समावेश करा
वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना सकाळचा नाश्ता टाळणे योग्य नाही. नाश्त्यामध्ये प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा. यासाठी अंडी, दूध, दही, पनीर, मूग किंवा डाळी यांसारखे पर्याय निवडू शकता. प्रथिनांमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार भूक लागणे आणि दिवसभर अतिरिक्त खाणे टाळता येऊ शकते. नाश्ता पौष्टिक आणि संतुलित असेल याची काळजी घ्या.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply