शरीरातील घाण आणि हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम किडनी करते. ही यंत्रणा दिवसभर शांतपणे कार्यरत असते. त्यामुळे किडनीच्या कामात थोडी जरी बिघाड झाला, तरी त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर जाणवू शकतो. किडनी बिघडू लागल्यावर शरीर काही संकेत देते. ते वेळीच ओळखणे गरजेचे आहे, कारण या संकेतांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
लघवीत दिसणारे बदल
लघवीच्या रंगात किंवा प्रमाणात बदल होणे हे किडनीच्या त्रासाचे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते. नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त लघवी होणे, रात्री वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीत फेस किंवा बुडबुडे दिसणे, लघवीतून रक्त येणे किंवा लघवीचा रंग गडद होणे अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
सूज आणि सततचा थकवा
किडनीचे काम बिघडल्यास शरीरातील हानिकारक पदार्थ योग्य प्रकारे बाहेर पडत नाहीत आणि शरीरात जास्तीचे पाणी साचू लागते. त्यामुळे पाय, घोटे आणि पोटऱ्यांना सूज येऊ शकते. या सूजेला वैद्यकीय भाषेत एडिमा म्हणतात. डोळ्यांभोवती सूज येणे आणि डोळ्यांना लालसरपणा दिसणे ही लक्षणेही जाणवू शकतात. कोणतेही विशेष काम न करता अचानक थकवा जाणवणे, सतत अशक्त वाटणे, चालताना त्रास होणे किंवा झोपेच्या समस्या जाणवणे हेही किडनीच्या त्रासाचे संकेत असू शकतात.
इतर लक्षणे आणि तपासणीचे महत्त्व
त्वचा कोरडी होणे आणि खाज येणे, भूक न लागणे, मळमळ किंवा उलट्या होणे, स्नायूंमध्ये गोळे येणे किंवा दुखणे, सतत उच्च रक्तदाब राहणे, बरगड्या आणि कंबरेच्या हाडांच्या मधल्या भागात दुखणे आणि सतत उचकी लागणे अशी लक्षणेही किडनीच्या आजारात दिसू शकतात. किडनीचा आजार सुरुवातीच्या टप्प्यात असताना अनेकदा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे कुटुंबात याआधी कोणाला किडनीचा आजार झाला असेल किंवा तुम्हाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर वेळोवेळी किडनीची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply