कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या, म्हणजेच गोकुळच्या निवडणुकीत कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी समविचारी आघाडीला कौल दिला असतानाही तो नाकारण्याचे काम महायुती सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. राज्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला हा संघ अमूलच्या ताब्यात देण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याविरोधात सोमवारी, ९ तारखेला कोल्हापुरात महामोर्चा काढण्यात येणार आहे.
गोकुळ वाचविण्यासाठी रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढाईसाठी सज्ज असल्याचा इशारा पाटील यांनी गुरुवारी गांधी भवन येथील पत्रकार परिषदेत दिला.
कायद्यात दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता
गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागा समविचारी आघाडीकडे असतानाही महायुतीचा अध्यक्ष करण्यासाठी शासन नियुक्त चार सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी कायद्यात सुधारणा आणि अधिनियम दुरुस्ती करण्यास बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे महायुतीचा गोकुळमधील सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाला. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.
गोकुळवर ५.५ लाख शेतकऱ्यांचा संसार
गोकुळ हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा दूध संघ असून आगामी काळात गोकुळच्या पदार्थांवर अमूलचे लेबल लावून संघ ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पाटील यांनी केला. राज्य सरकारने गोकुळची सत्ता काबीज करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचा घाट घातला असून त्यातून साखर कारखाने व जिल्हा बँकांना वगळण्यात आले आहे. हा कायदा फक्त गोकुळपुरता मर्यादित राहणार असून उद्या तो कोणत्याही संस्थेसाठी लागू केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले. मुंबईतील एसआरए प्रकल्पांनाही असेच नियम केले जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
भाजप सरकार सहकार क्षेत्रात चुकीचा पायंडा पाडत असून हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला जाणार असल्याचे पाटील म्हणाले. निवडणूक झाल्यानंतर कायदा आणून तो पूर्वलक्षी प्रभावाने कसा लागू होतो, असा सवाल त्यांनी केला. कोल्हापूरकरांनी दिलेला कौल सरकार नाकारत असून तो कोल्हापूरकर कदापि मान्य करणार नाहीत, असे ते म्हणाले. याविरोधात रस्त्यावरची लढाईबरोबर न्यायालयातही लढू, असा इशारा त्यांनी दिला.
गोकुळवर ५.५ लाख शेतकऱ्यांचा संसार चालतो. शेतकऱ्यांना दूधदरापोटी दर १० दिवसाला १०० कोटी रुपये दिले जातात आणि दररोज २० लाख लिटर दुधाचे संकलन होते, असे पाटील यांनी सांगितले. गोकुळ शेतकऱ्याच्या मालकीचा असून भाजप सरकार शेतकऱ्यांचा कौल डावलत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा कायदा करण्यामागे मंत्री हसन मुश्रीफ व चंद्रकांत पाटील यांचा सहभाग असल्याचेही पाटील म्हणाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply