मतदार यादीतील कथित अनियमितता, मतदारांची नावे मनमानी पद्धतीने वगळल्याचा आरोप आणि एसआयआर प्रक्रियेच्या विरोधात येवल्यात काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विंचूर चौफुली येथे हे आंदोलन करण्यात आले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि देशात निष्पक्ष निवडणुका घ्याव्यात, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंबेडकर पुतळ्यासमोर घोषणाबाजी
विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या कथित मनमानी कारभाराचा निषेध केला. ‘ज्ञानेश कुमार राजीनामा द्या’, ‘वोट चोर गद्दी छोड’, ‘एसआयआर प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे’, ‘वोट बचाओ, देश बचाओ’, ‘वोट चोरी बंद करा’, ‘माझे मत, माझा अधिकार’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
काँग्रेसचा आरोप काय?
मतदार यादीत मनमानी पद्धतीने नावे वगळून नागरिकांचा मतदानाचा वैधानिक अधिकार हिरावून घेतला जात असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. मतदार यादीतील अनियमिततेची सखोल चौकशी करून त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांची निश्चिती करावी, अशी मागणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या कामकाजातील अनियमिततेबाबत काँग्रेसकडे अनेक पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करत मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्यात यावे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
या आंदोलनात तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, शहराध्यक्ष रेहान पठाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply