जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विकसित भारत युवा संवाद – नो युवर व्होट हा कार्यक्रम झाला. युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या मेरा युवा भारत जळगाव यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात २५० हून अधिक विद्यार्थी आणि युवक सहभागी झाले.
हा कार्यक्रम देशभरातील ५०० विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६ या काळात सुरू असलेल्या राष्ट्रव्यापी उपक्रमाचा भाग आहे. जळगावच्या खासदार स्मिता वाघ या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे आणि डॉ. उमेश लाड, हर्षल सिखवाल तसेच जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे उपस्थित होते.
मतदान आणि लोकशाहीविषयी जागरूकता
कार्यक्रमात युवा आयकॉन कुमुदिनी झा यांनी मार्गदर्शन केले. युवकांमध्ये मतदान आणि लोकशाही यांविषयी जागरूकता निर्माण करण्यावर यावेळी भर देण्यात आला. उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय ग्रॅपलिंग कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारे शरद हटकर यांचा त्यांच्या क्रीडा कामगिरीबद्दल विशेष गौरव करण्यात आला. दुर्वा काळे यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. विलास मालकर यांनी आभार मानले. समारोप लोकशाहीची शपथ घेऊन झाला.
विकसित भारत २०४७ साठी युवकांची भूमिका
यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी युवकांशी संवाद साधला. विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या विकासप्रक्रियेत युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि लोकशाही मूल्यांचे जतन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply