प्रकाशपर्व अर्थात दिवाळी हा केवळ दिव्यांचा आणि फटाक्यांचा सण नसून प्रेम, आनंद, बंधुभाव, कृतज्ञता, समृद्धी आणि संस्कारांचा उत्सव आहे. जीवनातील अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञान, सद्भावना आणि आनंदाचा प्रकाश पसरवणे हाच दिवाळीचा खरा संदेश मानला जातो. या प्रकाशपर्वास गुरुवारी, ५ नोव्हेंबर रोजी प्रारंभ होत आहे.
गोवत्स बारस अर्थात वसुबारसपासून सुरू होणारा हा दीपोत्सव यमा द्वितीय म्हणजेच भाऊबीजेपर्यंत उत्सव म्हणून साजरा केला जातो. ५ ते ११ नोव्हेंबर या काळात दीपोत्सव साजरा होणार असून त्यातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे.
वसुबारस ते लक्ष्मीपूजन
गुरुवारी, ५ नोव्हेंबर रोजी वसुबारस हा दिवाळीचा पहिला सण आहे. या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. गाय भारतीय संस्कृतीत मातेसमान मानली जाते. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, पशुधनाचे महत्त्व जाणणे आणि निसर्गाशी प्रेमाचे नाते जपणे हा या सणाचा संदेश आहे. शुक्रवारी, ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी असून या दिवशी धन्वंतरी, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. धन्वंतरी हे आरोग्य आणि आयुर्वेदाचे देवता मानले जातात. या दिवशी सोने, चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे.
रविवारी, ८ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून जनतेला त्याच्या जाचातून मुक्त केले, अशी पौराणिक कथा आहे. पहाटे अभ्यंगस्नान करून सुगंधी उटणे लावले जाते आणि दिवे लावले जातात. वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचा विजय हा या सणाचा संदेश आहे. त्याच दिवशी लक्ष्मीपूजनही आहे. अमावस्या असूनही हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी लक्ष्मीमातेची पूजा केली जाते, घराची स्वच्छता करून रांगोळी, पणत्या आणि दिव्यांनी घर सजवले जाते, तर व्यापारी वर्ग नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करतो.
बलिप्रतिपदा आणि भाऊबीज
मंगळवारी, १० नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. राजा बळीच्या उदारतेची आणि दानशूरतेची आठवण या दिवशी केली जाते. महाराष्ट्रात पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम, आदर आणि विश्वास व्यक्त करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. बुधवारी, ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाते. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी होते. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्याची व सुखसमृद्धीची प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीला प्रेमाने भेटवस्तू देतो. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि अतूट नात्याचे महत्त्व सांगणारा हा सण आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply