दिवाळीनिमित्त खारघरमध्ये फटाक्यांची दुकाने सजली असून, यंदा ६४ फटाक्यांची दुकाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहेत. मात्र पारंपरिक फटाक्यांपेक्षा आकाशात रंगीबेरंगी रोषणाई करणारे, कमी आवाजाचे आणि कमी धूर निर्माण करणारे पर्यावरणपूरक फटाके खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे.
पर्यावरणाबाबत जागरूकता वाढत असल्याने हवा आणि ध्वनिप्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने अनेक कुटुंबे कमी धूर करणाऱ्या फटाक्यांना पसंती देत आहेत. आकाशात विविध रंगांची आकर्षक उधळण करणारे फटाके, रंगीत अनार, फुलबाज्या आणि कमी आवाजाचे फटाके यांना ग्राहकांकडून मागणी मिळत आहे. लहान मुलांसाठी फुलबाज्या, भुईचक्र आणि अनार यांसारख्या फटाक्यांना पसंती दिली जात असून, तरुणांमध्ये आकाशात रंगीत रोषणाई करणाऱ्या फटाक्यांचे आकर्षण कायम आहे. त्यामुळे यंदा फटाक्यांच्या बाजारपेठेत पर्यावरणपूरक पर्यायांची उपलब्धता वाढवण्यात आली आहे.
दरात १५ टक्क्यांनी वाढ
दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने खारघर परिसरात फटाके खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. यंदा फटाक्यांच्या दरात गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्च्या मालाचा तुटवडा आणि वाहतूक खर्चातील वाढ यामुळे उत्पादन खर्च वाढल्याचा थेट परिणाम किरकोळ विक्री दरावर झाला असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
मागील तीन वर्षांत फटाक्यांच्या भावात वाढ झाली नव्हती. मात्र यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरील इराण आणि अफगाणिस्तान परिसरातील युद्धजन्य परिस्थितीमुळे फटाके निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या तसेच विशिष्ट पावडरच्या आयातीवर परिणाम झाला आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढला असून, त्यामुळे या वर्षी जवळपास १५ टक्के दरवाढ झाली असल्याचे फटाकेविक्रेते आदेश भोईर यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply