नाशिक येथील सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी पोलिस यंत्रणेने कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. प्रत्येक रस्ता बॅरिकेडिंगने ठिकठिकाणी बंद करण्यात आला होता आणि गोदाघाटावर जाण्याच्या प्रत्येक पॉइंटवर नागरिकांची कसून तपासणी केली जात होती. या काटेकोर नियोजनामुळे चेंगराचेंगरीची शक्यता टळली.
गोदाघाटावर तोबा गर्दी, ठिकठिकाणी तपासणी
सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी सुमारे ३५ ते ४० हजार नागरिकांनी गोदाघाटावर उपस्थिती लावली होती. गोदाघाटाच्या दुतर्फा भाविकांची तोबा गर्दी झाली होती. पोलिसांच्या पायी गस्तीपथकांसह प्रत्येक गल्लीत लावलेल्या बॅरिकेडिंगजवळ पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गोदाघाटावर उतरणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांनी मेटल डिटेक्टर उभारले होते. ते पार केल्यानंतरही पोलिसांकडून नागरिकांकडील बॅगेची कसून तपासणी केली जात होती. महिलांच्या पर्सची तपासणी महिला पोलिसांकडून केली जात होती.
परतीच्या मार्गावरही शिस्त
ध्वजारोहण सोहळा आटोपल्यानंतर गोदाघाटावरील नागरिक परतीच्या मार्गाने जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी या परतणाऱ्यांच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या नागरिकांना मज्जाव करीत दुसऱ्या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे दोन्ही दिशांनी येणाऱ्या नागरिकांतून गर्दी होऊन चेंगराचेंगरी होण्याची शक्यता टळली. पोलिसांच्या या दक्षतेचे काही जागरूक नागरिकांनी कौतुक केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply