रविवार, १ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

मेन्यूकार्डवर कॅलरी नोंद, खाण्यापूर्वी पौष्टिकता तपासा

राज्यातील साखळी हॉटेल व रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डवर आता पदार्थांतील कॅलरींची माहिती दिली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमेचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.

मेन्यूकार्डवर कॅलरी नोंद, खाण्यापूर्वी पौष्टिकता तपासा

हॉटेलमध्ये मिळणाऱ्या अन्नपदार्थांची गुणवत्ता उत्तम असावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राबवलेल्या मोहिमेचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील साखळी हॉटेल आणि महत्त्वाच्या रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्ड तसेच प्रदर्शन फलकांवर पदार्थांमध्ये किती कॅलरी आहेत, याची स्पष्ट माहिती ग्राहकांना दिली जात आहे. त्यामुळे आपल्या ताटात येणारा पदार्थ आरोग्यदायी आहे का, याची खात्री ग्राहकांना करता येत आहे. अन्नपदार्थांमध्ये किती कॅलरी आहेत, याची माहिती विचारणे हा ग्राहकांचा आरोग्यहक्क असल्याचे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रशासनाने राज्यात आतापर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील अन्नगुणवत्ता तपासणीसंदर्भात ६० हजारांहून अधिक कारवाया केल्या आहेत. सूचना देण्यापासून ते परवाना स्थगित करणे किंवा रद्द करणे अशा विविध कारवाया अन्नसुरक्षेच्या निकषांनुसार करण्यात आल्या. निकषांची पूर्तता झाल्याचा निर्वाळा मिळाल्यानंतर केलेल्या फेरतपासणीत साखळी रेस्टॉरंट आणि मोठ्या हॉटेलांनी अन्नपदार्थांची गुणवत्ता चाचणी करून पौष्टिक घटकांचे प्रमाण आणि कॅलरी मोजमाप याबाबत प्रमाणपत्र घेतल्याचे आढळले. ही माहिती मेन्यूकार्डमध्ये देण्यासही सुरुवात झाली आहे.

पनीर अ‍ॅनालॉग बाद, पाण्याचा आग्रह कमी

पनीरऐवजी पनीर अ‍ॅनालॉगचा वापर काही ठिकाणी वाढला होता. ग्राहकांमध्ये अन्नसाक्षरता कमी असल्याने पनीर आणि अ‍ॅनालॉगमधील फरक अनेकांना कळत नव्हता आणि ते पनीर समजून अ‍ॅनालॉगचे सेवन करत होते. प्रशासनाच्या कडक निर्देशांनंतर हॉटेलांमधून हा पदार्थ बाद झाला आहे. आता ग्राहकांना पनीर, दूध आणि चांगल्या प्रतीचे दुग्धजन्य पदार्थ मिळू लागले आहेत. पाणी विकत घेण्याचा आग्रह कमी झाला असून, स्वच्छ आणि सुरक्षित पाणीही उपलब्ध होऊ लागल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. यासंदर्भातील तपासणी मोहीम वेळोवेळी राबवली जाते आणि तक्रारींसाठी येणाऱ्या कॉलमध्येही याबाबत विचारणा करून खात्री केली जाते.

रंगहीन गोड पदार्थ, शाळांच्या कॅण्टीनमध्ये बदल

ज्या गोड पदार्थांमध्ये पूर्वी रंगाचा सर्रास वापर केला जात होता, त्या पदार्थांमध्ये रंगाचा अवास्तव आणि अनावश्यक वापर कमी झाला आहे. भेसळयुक्त मसाल्यांच्या पदार्थांवर निर्बंध आल्याने त्यांची गुणवत्ताही सुधारली आहे. परवाने रद्द किंवा निलंबित होण्याच्या भीतीने हॉटेल व्यावसायिकांनी हे बदल स्वीकारल्याचे तपासणी मोहिमांमध्ये दिसून आले आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे ७० हजार शाळांमध्ये कॅण्टीनमधील अन्नपदार्थांच्या गुणवत्तेसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी झुणका-भाकरी, थालिपीठ, पोहे, उपमा, मिश्र भेळ, पनीर टिक्की यांसारख्या नाविन्यपूर्ण आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश कॅण्टीनच्या मेन्यूमध्ये करण्यात आला आहे.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance