मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राजकीय वातावरण तापलेले असताना सत्ताधारी पक्षाने या विधेयकासाठी दोन-तृतीयांश बहुमतापेक्षा अधिक पाठबळ असल्याचा दावा केला आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला ३७१ लोकसभा खासदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. ५४३ सदस्यांच्या सभागृहात आवश्यक असलेल्या दोन-तृतीयांश बहुमतापेक्षा ही संख्या अधिक आहे.
सोमवारी लोकसभेत नवीन घटनादुरुस्ती विधेयक सादर करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. हे विधेयक सादर झाल्यानंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या जागांमध्येही ५० टक्क्यांनी वाढ केली जाईल. महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी आणि जागांची संख्या कमाल ८५० पर्यंत वाढवण्यासाठी मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव आहे.
## ३७१ खासदारांचे पाठबळ कसे?
राखीव अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मतदारसंघांमध्येही महिलांसाठी कोटा असेल. विधेयक मंजूर करण्यासाठी ३७१ लोकसभा खासदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले आहे. सत्ताधारी आघाडीच्या घटक पक्षांव्यतिरिक्त आणखी कोण या विधेयकाला पाठिंबा देईल, हे मात्र उघड करण्यात आलेले नाही. महिला आरक्षणाचा मुद्दा वगळता हे सीमांकन विधेयक १९५७ च्या कायद्यासारखेच असल्याचे सांगण्यात येते.
## सीमांकन आयोगाची रचना कशी असेल?
प्रस्तावित विधेयकानुसार सीमांकन आयोगात एक अध्यक्ष असतील. केंद्र सरकारकडून नियुक्त केलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश हे अध्यक्षपद भूषवतील. मुख्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेले निवडणूक आयुक्त आयोगाचे सदस्य असतील. संबंधित राज्यांसाठी राज्य निवडणूक आयुक्तही आयोगाचे सदस्य असतील.
संबंधित राज्यांमधील पाच लोकसभा खासदार आणि पाच आमदार हे आयोगाचे सहयोगी सदस्य असतील. त्या राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाच्या संख्याबळाच्या आधारावर लोकसभेचे अध्यक्ष खासदारांची नियुक्ती करतील. त्याचप्रमाणे राज्य विधानसभेचे अध्यक्ष त्या राज्यातील पक्षाच्या स्थितीनुसार पाच आमदारांची नियुक्ती करतील. सीमांकन आयोगाचा अहवाल संसदेसमोर सादर केला जाईल. सभागृह त्यात सुधारणा करू शकेल किंवा तो फेटाळूही शकेल.
एका अधिकाऱ्याने सांगितले की सीमांकन विधेयक ही काळाची गरज आहे. जर हे विधेयक आता मंजूर झाले तर २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत पुनर्रचित सीमांसह महिला आरक्षण लागू करता येईल. अन्यथा २०३४ पर्यंत वाट पाहावी लागेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा