देशात डिलिमिटेशन विधेयकावरून जोरदार चर्चा सुरू आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार आहे. इंडिया आघाडीने हे विधेयक अधिवेशनात पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आघाडीचे नेते एम. के. स्टॅलिन आणि शरद पवार यांना डिलिमिटेशनच्या विरोधात भूमिका घ्यावी, अशी विनंती करत आहेत. अधिवेशनातील मतदानात प्रत्येक खासदाराचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. अशा वातावरणात काँग्रेसच्या एका खासदाराची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मतदानाच्या काही तास आधी खासदाराची प्रकृती बिघडल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
केरळचे खासदार के. सुधाकरन यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष आणि सुधाकरन यांच्या कुटुंबीयांनी यामागे सत्ताधाऱ्यांचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
मुलाने काय सांगितले
सुधाकरन यांच्या मुलाने सांगितले की, त्यांचे वडील शुक्रवारी नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मेंदूशी संबंधित समस्येमुळे ४८ तास विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. डॉक्टरांनी कळवले आहे की, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून रविवारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जाईल.
मुलाने पुढे आरोप केला की, त्यांचे वडील रविवारी सकाळी दिल्लीला जाण्याची तयारी करत होते. मात्र रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांना अचानक अतिदक्षता विभागात दाखल केले. कुटुंबीयांनाही त्यांना भेटू दिले नाही. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या वरिष्ठांचा फोन आला होता. त्यांचे वडील दबावाखाली आणि नियंत्रणाखाली आहेत. त्यांना दिल्लीला परत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप मुलाने केला आहे.
काँग्रेस नेत्यांचे आरोप
या घटनेवर केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांनीही गंभीर आरोप केले आहेत. खासदारांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यास मनाई करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामागे सरकारचा हस्तक्षेप असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. अधिवेशनातील मतदानाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा