वर्ध्यातील प्रसिद्ध गोरस भंडार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत वर्ध्याचे सहाय्यक आयुक्त (अन्न) आणि नियुक्त अधिकारी प्रफुल्ल बी. टोपले यांना २७ नोव्हेंबरला निलंबित करण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाने गोरस भंडारवर केलेली कारवाई बेकायदेशीर ठरवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गोरस भंडारमधील अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनासंदर्भात डिसेंबर २०२३ आणि जून २०२५ मध्ये दोन तपासणी अहवाल तयार करण्यात आले होते. मात्र, या अहवालांवर टोपले यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा ठपका निलंबन आदेशात ठेवण्यात आला आहे. न्यायालयीन सुनावणीदरम्यान ही बाब समोर आल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली.
## न्यायालयाने कारवाई का रद्द केली
३१ मे २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गोरस भंडारवर अचानक तपासणी केली होती. या तपासणीनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ जून रोजी वर्ध्याच्या सहाय्यक आयुक्तांनी संस्थेचा परवाना निलंबित केला होता. त्यामुळे संस्थेचे उत्पादन बंद झाले होते. या कारवाईविरोधात गोरस भंडारने न्यायालयात धाव घेतली होती.
७ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनिल एस. किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने प्रशासनाची कारवाई रद्द केली. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ मधील तरतुदींनुसार आवश्यक प्रक्रिया न पाळता ही कारवाई करण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, प्रशासनाने ज्या सुधारणा नोटिशीचा आधार घेतला होता, ती नोटीस संस्थेला बजावण्यातच आली नव्हती, असेही न्यायालयाने नमूद केले.
## गोरस भंडारचे ऐतिहासिक महत्त्व
गोरस भंडार हा केवळ एक दुग्धव्यवसाय नसून त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. १९३१ मध्ये महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांनी गोसंवर्धन आणि ग्रामीण स्वावलंबनाच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली होती. आज या सहकारी संस्थेमार्फत १५ गावांमधील जवळपास ८०० कुटुंबांकडून दररोज सुमारे ९ हजार लिटर दूध संकलित केले जाते. या दुधापासून पेढा, बासुंदी, श्रीखंड, तूप आणि प्रसिद्ध गोरस पाक यांसारखे पदार्थ तयार केले जातात.
प्रतिक्रिया व्यक्त करा