डिलिमिटेशन विधेयकावरून इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीचे नेते आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यामध्ये ७० मिनिटे चर्चा झाली. परंतु या बैठकीत राहुल गांधींच्या प्रयत्नांना अपयश आले आहे. डिलिमिटेशन विधेयक मांडण्याच्या आधी काही तास शिल्लक असतानाच इंडिया आघाडीच्या हाती मोठे अपयश लागले आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची चिंता वाढली आहे.
## चेन्नईतील भेटीत काय घडले?
इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांसहित खासदार राहुल गांधी यांनी चेन्नईत मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधींनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी बोलताना डिलिमिटेशन विधेयकाला विरोध असल्याचे स्पष्ट केले. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा न मिळू न देण्याचा आमचा प्रयत्न आहे. डिलिमिटेशन विधेयकावरील आमची भूमिका एमके स्टॅलिन यांना समजावून सांगितली, असे राहुल गांधी म्हणाले.
आमचा डिलिमिटेशन विधेयकाला विरोध कायम असणार आहे. भाजपला जे हवे आहे, ते मिळू न देण्याचा आमचा प्रयत्न आहे. डिलिमिटेशन हे तामिळ संस्कृतीसाठी घातक आहे. आरएसएस ही एक तामिळविरोधी शक्ती आहे. भाजपने ८५० आकडा गाठला तर संविधान संपेल, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
## स्टॅलिन यांनी पाठिंब्याचा निर्णय का घेतला?
डीएमके नेते स्टॅलिन यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, इतर नेते आणि तीन मुख्यमंत्री भेटीसाठी आले होते. डिलिमिटेशन विधेयकावरून भूमिका स्पष्ट करण्यास सांगितली. आदल्या दिवशी डीएमके खासदारांसोबत बैठक झाली होती. खासदारांसोबत डिलिमिटेशनवर चर्चा केली. सरकारने आमच्या अटी मान्य केल्या आहेत. तसेच काही समस्या देखील त्यांना सांगितल्या, असे स्टॅलिन म्हणाले.
डिलिमिटेशन विधेयक पडले तर तामिळनाडूचा वाटा कमी होऊ शकतो. त्यामुळे पुढील २५ वर्षांसाठी तामिळनाडूचे हक्क आणि त्याचा वाटा सुरक्षित ठेवण्यासाठी पाठिंब्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, एमके स्टॅलिन यांच्या भूमिकेने इंडिया आघाडीची चिंता वाढली आहे. आता उद्या होणाऱ्या विशेष संसदीय अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा