देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वेगाने वाढत असताना ऑटोमोबाईल डीलर्ससमोर आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमुळे पारंपरिक सर्व्हिसिंग आणि सुट्या भागांमधून मिळणारे उत्पन्न कमी होत आहे. दुसरीकडे वाढता व्यवसाय खर्च, कर्जावरील व्याज आणि वाहनांचा साठा सांभाळण्याचा खर्च यामुळे डीलरशिपच्या नफ्यावर परिणाम होत आहे.
सणासुदीच्या काळात वाहन विक्रीत चांगली वाढ झाली असली तरी डीलर्सच्या प्रत्यक्ष कमाईबाबत चिंता कायम आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापरामुळे डीलर्सच्या उत्पन्नाचे पारंपरिक गणित बदलत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सणासुदीत इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, ११ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या ४२ दिवसांच्या सणासुदीच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या किरकोळ विक्रीत वर्षभराच्या तुलनेत ५२.६२ टक्के वाढ होऊन हा आकडा ५.१० लाख युनिट्सवर पोहोचला. याच काळात इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत ६१.१० टक्के आणि इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांच्या विक्रीत ७२.९१ टक्के वाढ झाली. ऑक्टोबर महिन्यात ३,५४,६२५ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली.
याच ४२ दिवसांत एकूण वाहनांच्या किरकोळ विक्रीत २.२१ टक्के वाढ होऊन ५५.२५ लाख युनिट्सची विक्री झाली. मात्र प्रवासी वाहनांच्या विक्रीत ७.१६ टक्के घट होऊन हा आकडा ७.४९ लाख युनिट्सवर आला. त्यामुळे विक्री वाढली असली तरी सर्व विभागांत सारखी स्थिती नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
साठा आणि कर्जाचा खर्च वाढतोय
डीलर्ससमोर आणखी एक अडचण म्हणजे शोरूममध्ये विक्री न झालेल्या वाहनांचा साठा. ऑक्टोबरमध्ये प्रवासी वाहनांचा साठा ४३ ते ४५ दिवसांपर्यंत होता. या संघटनेच्या मते हा साठा २१ दिवसांच्या शिफारस केलेल्या पातळीवर असणे योग्य आहे. डिसेंबरअखेर तो ३० दिवसांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
सर्वेक्षणातील सुमारे ३१ टक्के डीलर्सनी वाढत्या कर्जाच्या खर्चाचा आणि हप्त्यांचा व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सांगितले. फेडरेशनचे माजी अध्यक्ष विंकेश गुलाटी यांच्या मते, इलेक्ट्रिक वाहनांसाठी डीलर्सना नव्या सर्व्हिस सुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर गुंतवणूक करावी लागत आहे, पण या वाहनांमधून नियमित सर्व्हिसिंगचे उत्पन्न कमी मिळते. त्यामुळे वाहन उत्पादकांनी प्रत्येक वाहनाच्या संपूर्ण आयुष्यातून डीलर्सना मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून मार्जिन ठरवावे, असे त्यांनी म्हटले आहे.
नोव्हेंबर ते जानेवारी या काळात ५०.४१ टक्के डीलर्सना विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. तर ४०.०८ टक्के डीलर्सना विक्री स्थिर राहील आणि ९.५० टक्के डीलर्सना घट होईल असे वाटते. इलेक्ट्रिक वाहनांचा विस्तार करताना डीलर्सनाही योग्य उत्पन्न मिळेल, अशी व्यवस्था तयार करणे गरजेचे बनले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा