, ३० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

महिला आरक्षण आजपासून लागू करा; फेररचनेची अट नको — चव्हाण

महिला आरक्षणाच्या नावाखाली खासदारांची संख्या वाढवून फेररचना करून देशाचे राजकीय गणित बदलण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

महिला आरक्षण आजपासून लागू करा; फेररचनेची अट नको — चव्हाण

महिला आरक्षणाच्या नावाखाली लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवून आणि लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची फेररचना करून देशातील लोकशाही व्यवस्थेचे राजकीय गणित बदलण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. महिला आरक्षण लागू करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेची अट घालण्याची गरजच काय? महिलांना आरक्षण द्यायचे असेल तर आजपासूनच लागू करा; मात्र, त्याच्या आडून राज्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वाशी खेळ करू नका, अशा शब्दांत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

सातारा येथील जिल्हा काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महिला आरक्षण विधेयक, लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्र सरकारच्या राजकीय हालचालींवर त्यांनी आक्रमक भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महिला आरक्षणासाठी फेररचनेची अट कशाला?

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला लक्ष्य करताना चव्हाण म्हणाले, महिला आरक्षणाला काँग्रेसचा विरोध नाही; उलट महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे. मात्र, आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लोकसंख्येवर आधारित मतदारसंघ पुनर्रचनेची अट जोडणे हा वेगळाच राजकीय हेतू असल्याचे दिसते. महिला आरक्षण आजपासून लागू करा आणि आगामी निवडणुकांमध्ये महिलांना त्याचा लाभ द्या. परंतु, आरक्षणाच्या आडून लोकसभेतील राज्यनिहाय जागांची संख्या बदलण्याचा प्रयत्न करू नका, असे ते म्हणाले.

लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या राज्यांना शिक्षा का?

ज्या राज्यांनी कुटुंब नियोजन, महिला शिक्षण आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी पुढाकार घेतला, त्यांनाच लोकसंख्या कमी झाल्यामुळे लोकसभेतील जागा गमावण्याची वेळ येणार असेल, तर ही त्या राज्यांना शिक्षा ठरेल, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.

चव्हाण म्हणाले, विशेष अधिवेशन बोलावण्यापूर्वीच केंद्र सरकारने राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदारांसह अन्य पक्षांच्या खासदारांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या खासदारांना नेमकी कोणती आश्वासने दिली जात आहेत, हे स्पष्ट झाले पाहिजे.

विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने केवळ विधेयकाचा विषय नसून त्यामागे मोठे राजकीय गणित असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा सुरू असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशीही चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance