चांदीचे दागिने घालण्याची अनेकांना आवड असते. विशेषतः चांदीचे कडे, ब्रेसलेट, पैंजण आणि चैन अधिकच शोभून दिसतात. धार्मिक मान्यतेनुसार चांदीचे दागिने शुभ मानले जातात. मात्र सतत वापर केल्यामुळे काही दिवसांनी चांदीच्या दागिन्यांची चमक कमी होऊ लागते. अनेकदा चांदीचे दागिने काळे पडतात. हवेतील गंधक, घाम, परफ्युम, लोशन आणि पाण्यामुळे चांदीवर सिल्व्हर सल्फाइडचा थर तयार होतो. त्यामुळे चांदी काळी पडते. मात्र काळजी करण्याची गरज नाही. काही सोप्या घरगुती उपायांनी चांदीच्या दागिन्यांचा काळेपणा कमी करून त्यांची चमक परत मिळवता येते.
बेकिंग सोडा, टूथपेस्ट आणि लिंबूचा वापर
चांदीवरील काळेपणा दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि ॲल्युमिनियम फॉइलचा वापर करता येतो. यासाठी एका भांड्यात ॲल्युमिनियम फॉइल अंथरून त्यात गरम पाणी घ्यावे. त्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ मिसळावे. त्यानंतर काळे पडलेले चांदीचे दागिने या पाण्यात १० ते १५ मिनिटे ठेवावेत. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन मऊ कापडाने पुसून घ्यावेत. मात्र खडे, मोती किंवा नाजूक डिझाईन असलेल्या दागिन्यांसाठी ही पद्धत वापरू नये.
चांदीच्या दागिन्यांवर हलका काळेपणा किंवा धूळ साचली असेल तर पांढऱ्या टूथपेस्टचा वापर करता येतो. दागिन्यांवर टूथपेस्टचा पातळ थर लावावा. मऊ ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने स्वच्छ करावे. त्यानंतर कोमट पाण्याने दागिने व्यवस्थित धुऊन घ्यावेत. टूथपेस्ट दागिन्यांवर राहणार नाही याची काळजी घ्यावी. शेवटी मऊ कापडाने दागिने कोरडे करावेत. मात्र टूथपेस्टमुळे चांदीवर ओरखडे पडू शकतात, त्यामुळे आधी छोट्या भागावर चाचणी करावी.
चांदीचा काळेपणा कमी करण्यासाठी लिंबाचा रस आणि मिठाचाही घरगुती उपाय केला जातो. यासाठी अर्ध्या कप पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ मिसळावे. या मिश्रणात चांदीचे दागिने काही मिनिटे ठेवावेत. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन मऊ कापडाने पुसावे. मात्र आम्लामुळे काही दागिन्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नाजूक किंवा खडे असलेल्या दागिन्यांवर हा प्रयोग टाळावा.
चांदीची चमक टिकवण्यासाठी काळजी
चांदीच्या दागिन्यांची चमक टिकवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. परफ्युम, डिओडोरंट किंवा लोशन लावल्यानंतरच चांदीचे दागिने घालावेत. अंघोळ करताना, पोहताना आणि घरातील कामे करताना दागिने काढून ठेवावेत. वापर नसताना चांदीचे दागिने मऊ कापडात गुंडाळून किंवा झिप-लॉक बॅगेत कोरड्या जागी ठेवावेत. यामुळे ओलावा आणि हवेचा संपर्क कमी होऊन चांदीची चमक टिकवण्यास मदत होईल.
प्रतिक्रिया व्यक्त करा