नाशिकमध्ये रिंगरोडच्या भूसंपादनाला सुरुवात झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांनी शनिवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला. त्यानंतर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार सक्तीच्या भूसंपादनाला ८ ते १० दिवसांची स्थगिती दिली. तसेच गवळवाडी मार्गाचे फेरसर्वेक्षण आणि मखमलाबाद मार्गाच्या अलाइनमेंटमध्ये बदल करण्याबाबत पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले.
रिंगरोडबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, पालकमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी शेतकऱ्यांनी चुकीची अलाइनमेंट, अपुरा मोबदला, घाईघाईने जाहीर केलेले भूसंपादन निवाडे आणि पोलिस बळाच्या वापरावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदार गोकुळ गीते यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.
मंगळवारी मुंबईत पालकमंत्र्यांसोबत बैठक
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबई येथे शेतकरी प्रतिनिधींसोबत विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे. रिंगरोडबाधितांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याचे या बैठकीत प्रयत्न केले जाणार आहेत.
तसेच जिरायतीवरून बागायती झालेल्या जमिनींना वाढीव गुणांक आणि योग्य मोबदला मिळाला आहे की नाही, याचा एकत्रित अहवाल भूसंपादन अधिकाऱ्यांकडून मागविण्यात येणार असून सोमवारी शेतकरी प्रतिनिधींसमोर तो सादर केला जाणार आहे.
दरम्यान, बुधवारी एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत शेतकरी प्रतिनिधींची बैठक होणार असून, पर्यायी मार्ग आणि नवीन अलाइनमेंटबाबत चर्चा केली जाणार आहे.
बुधवारपर्यंत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी इशारा दिला की, बुधवारपर्यंत आश्वासनाची ठोस अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. विकासाला विरोध नसून शेतकऱ्यांच्या जमिनी, विहिरी, फळबागा आणि उदरनिर्वाहाची साधने वाचविण्यासाठी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराभोवती उभारण्यात येणाऱ्या परिक्रमा मार्ग अर्थात रिंगरोड प्रकल्पाने आता निर्णायक टप्पा गाठला आहे. या प्रकल्पासाठी संपादित जमिनींचा प्रत्यक्ष ताबा घेण्यास सुरुवात झाली असून त्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे सोपविण्यात येत आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा