वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात राज्याच्या परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. एका कॅलेंडर वर्षात पाच किंवा त्यापेक्षा अधिक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकाचा वाहन परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना परिपत्रक जारी करण्यात आले असून, अशा चालकांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्रीय मोटार वाहन नियम २०२६ लागू झाल्यानंतर ही कारवाई केली जात आहे. या नियमांनुसार वारंवार नियम मोडणाऱ्या चालकांची यादी तयार करण्याची जबाबदारी आरटीओ कार्यालयांवर असेल. मोटार वाहन कायद्यातील कलम १९ अंतर्गत संबंधित चालकाचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली जाऊ शकते. मात्र, पाच चलन झाले म्हणजे परवाना आपोआप निलंबित होईल, असे नाही. संबंधित चालकाची ओळख पटवून नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.
पाच उल्लंघनांवर कारवाई कशी होणार
या कारवाईसाठी कॅलेंडर वर्षाचा आधार घेतला जाणार आहे. आरटीओ कार्यालये दरवर्षीच्या सुरुवातीला वारंवार नियम मोडणाऱ्या चालकांची यादी अद्ययावत करतील. उदाहरणार्थ, २०२६ मध्ये झालेल्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनांची मोजणी त्याच वर्षाच्या नोंदींनुसार केली जाईल. २०२६ मधील उल्लंघने २०२७ मधील उल्लंघनांमध्ये जोडली जाणार नाहीत.
कारवाईसाठी प्रत्येक चलनाची नोंद चालकाच्या नावासह आणि वाहन परवाना क्रमांकासह असणे आवश्यक आहे. केवळ वाहन क्रमांकाच्या आधारे तयार झालेल्या आणि चालकाची ओळख स्पष्ट नसलेल्या स्वयंचलित चलनांची मोजणी संबंधित व्यक्तीच्या उल्लंघनांमध्ये केली जाणार नाही. त्यामुळे कोणत्या चालकाने किती वेळा नियम मोडले, हे स्पष्ट नोंदींवरूनच ठरवले जाईल.
थकीत ई-चलन असल्यास काय होईल
परिवहन विभागाची कारवाई केवळ वारंवार नियम मोडणाऱ्या चालकांपुरती मर्यादित राहणार नाही. दीर्घकाळ ई-चलनाची रक्कम न भरलेल्या वाहनांनाही ब्लॅकलिस्ट केले जाऊ शकते. अशा वाहनांच्या मालकांना वाहन नोंदणी प्रमाणपत्राशी संबंधित अडचणी येऊ शकतात.
त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याबरोबरच आपल्या वाहनावरील प्रलंबित चलनांचा वेळेत भरणा करणे आवश्यक आहे. नियम पाळणे आणि चलन वेळेत भरणे, हेच परवाना आणि वाहन नोंदणी सुरक्षित ठेवण्याचा सोपा मार्ग आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा