म्यानमारमधील प्रसिद्ध ताझौंगडाईंग हॉट-एअर बलून महोत्सवात एक भीषण दुर्घटना घडली. शान राज्याची राजधानी असलेल्या ताउंगगी येथे होणाऱ्या या वार्षिक महोत्सवादरम्यान फटाक्यांनी भरलेला एक महाकाय बलून गर्दीच्या अगदी वर हवेतच निकामी झाला. फटाके वेळेपूर्वीच फुटले आणि जळत्या ठिणग्या व तुकडे थेट खाली उभ्या असलेल्या लोकांवर पडले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरला आहे.
२० नोव्हेंबरच्या रात्री नेमके काय घडले?
ही दुर्घटना २० नोव्हेंबरच्या रात्री, रात्रीच्या बलून उड्डाण स्पर्धेदरम्यान घडली. नेहमीप्रमाणे आकाशातील फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी हजारो लोक जमले होते. पण महाकाय बलून वर जाताच त्याला आग लागली. आकाशात उंच झेपावण्याऐवजी फटाके जमिनीच्या अगदी जवळ फुटले. फटाक्यांच्या अचानक झालेल्या स्फोटामुळे उपस्थित लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. सामाजिक माध्यमांवर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावताना आणि किंचाळताना स्पष्टपणे दिसत आहेत. पडणाऱ्या ठिणग्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अनेकांनी अंगावर ब्लँकेटही घेतले होते.
या घटनेत सोळा जण भाजले, तर घबराट आणि किरकोळ जखमांमुळे सुमारे १२० जणांना वैद्यकीय उपचारांची गरज भासली. सुदैवाने या घटनेत कोणीही ठार झाले नाही.
दरवर्षी साजरा होणारा दिव्यांचा सण
म्यानमारमध्ये दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात दिव्यांचा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवसा बांबू आणि कागदापासून बनवलेले हस्तनिर्मित फुगे उडवले जातात. दिवसा प्राण्यांच्या आकाराचे फुगे उडवले जातात, तर रात्री फटाक्यांनी सजवलेले ‘न्यामेकी’ फुगे आकाशात सोडले जातात. २०२६ च्या स्पर्धेत एकूण ५६१ फुग्यांनी भाग घेतला होता. ही दुर्घटना निष्काळजीपणा होती की अपघात, याबाबत चर्चा सुरू आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा