घर स्वच्छ ठेवण्यासाठी रोज झाडू आणि पोछा मारला जातो. कोपरे, सोफ्याखालची जागा आणि बेडखालची जागा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही फरशीवर केस, बारीक धूळ आणि कपड्यांचे छोटे धागे तसेच राहतात. पुन्हा पुन्हा झाडू मारावा लागतो. या त्रासावर घरातच असलेला एक सोपा उपाय उपयोगी पडू शकतो — जुने मोजे.
घरात वापरात नसलेले जुने मोजे सहसा फेकून दिले जातात. पण हेच मोजे फरशी स्वच्छ करण्यासाठी कामी येऊ शकतात. कापसाचे किंवा कापूस-मिश्रित कापडाचे मोजे बारीक धूळ, केस आणि कपड्यांचे तंतू पकडण्यास मदत करतात. यासाठी काहीही नव्याने विकत घ्यायची गरज नाही. एक जुना स्वच्छ मोजा आणि सपाट पोछा एवढेच साहित्य पुरेसे आहे.
पोछ्यावर जुना मोजा कसा चढवायचा?
१. जुना मोजा निवडा — घरातला एक जुना, स्वच्छ आणि फारसा फाटलेला नसलेला मोजा घ्या. शक्यतो कापसाचा किंवा कापूस-मिश्रित कापडाचा मोजा निवडा. त्यातून धागे किंवा तंतू निघत नाहीत ना, याची खात्री करा.
२. पोछ्यावर मोजा चढवा — हा मोजा सपाट पोछ्याच्या खालच्या रुंद भागावर व्यवस्थित चढवा. पोछा वापरताना मोजा सतत निसटणार नाही, याची काळजी घ्या.
३. फरशीवर पोछा फिरवा — नेहमीप्रमाणे पोछा पुढे-मागे फिरवा. बेड, सोफा, कपाट आणि घराच्या कोपऱ्यांमध्ये ही पद्धत वापरा. मोज्याच्या कापडामुळे फरशीवरील केस, बारीक धूळ आणि कपड्यांचे तंतू एकत्र गोळा होण्यास मदत होते.
ही पद्धत का उपयुक्त ठरते?
या छोट्याशा युक्तीमुळे झाडू-पोछा पुन्हा पुन्हा मारण्याची गरज कमी होते आणि फरशी जास्त वेळ स्वच्छ राहते. घरात पडून असलेल्या जुन्या वस्तूचा उपयोगी वापर होतो आणि स्वच्छतेचे कामही सोपे होते. सोफा, बेड आणि कपाटाखाली साचलेली घाण साफ करताना होणारी कसरतही यामुळे कमी होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा