, ३० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

हुंड्यात स्कॉर्पिओ मागितली, खेळण्यातील कार देऊन उत्तर

मेरठमध्ये लग्न ठरल्यानंतर हुंड्यात कारची मागणी झाली. मुलीच्या कुटुंबीयांनी खेळण्यातील कार देऊन उत्तर दिले आणि साखरपुडा परत करत लग्न मोडल्याचे जाहीर केले.

हुंड्यात स्कॉर्पिओ मागितली, खेळण्यातील कार देऊन उत्तर

सोशल मीडियावर सध्या उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील एका लग्नाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लग्न ठरल्यानंतर मुलाकडच्यांनी हुंड्यात कारची मागणी केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. या मागणीला अनोख्या पद्धतीने उत्तर देत मुलीच्या कुटुंबीयांनी चक्क खेळण्यातील प्लास्टिकची कार मुलाच्या वडिलांच्या हातात दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हुंड्याच्या मागणीला दिलेले हे अनोखे उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

## पाच महिन्यांपूर्वी ठरलेले लग्न

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मेरठमधील भावनपूरमध्ये एका गावातील तरुणाचे लग्न परतापूरच्या एका तरुणीशी पाच महिन्यांपूर्वी ठरले होते. दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने साखरपुडाही झाला होता. त्यावेळी मुलीकडच्यांनी रोख रक्कम आणि इतर काही वस्तू दिल्या होत्या. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते.

मात्र 29 नोव्हेंबर रोजी मुलीच्या घरी लग्नातील लाल खत हा विधी पार पडणार होता. यासाठी मुलाकडील मंडळी सकाळीच मुलीच्या घरी पोहोचली होती. मात्र बराच वेळ होऊनही ही विधी पडली नाही. सकाळची संध्याकाळ झाली, तरी देखील विधीला सुरुवात झाली नव्हती.

## खेळण्यातील कार आणि लग्न रद्द

मुलीच्या कुटुंबीयांच्या आरोपानुसार, काही दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबाची जमीन विकली गेली होती. याची माहिती मुलाकडच्यांना मिळाल्यानंतर त्यांनी हुंड्यात कारची मागणी केली. मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाकडचे आपल्या मागणीवर ठाम होते.

अखेर मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाकडच्यांना धडा शिकवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. बाजारातून लहान मुलांच्या खेळण्यातील प्लास्टिकची कार मागवण्यात आली. त्यानंतर ही कार मुलाच्या वडिलांच्या हातात देण्यात आली. यावेळी मुलीच्या कुटुंबातील एका व्यक्तीने, ‘तुम्हाला माणूस नको होता, तुम्हाला कार हवी होती. आम्ही तुम्हाला स्कॉर्पिओ दिली आहे, आता ती चालवा,’ असा उपरोधिक टोला लगावला. तसेच, साखरपुडा परत करण्यात आला असून लग्न रद्द केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance