आजकाल स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. दिवसभर मोबाईलचा वापर केल्यानंतर अनेकजण रात्री झोपण्यापूर्वी फोन चार्जिंगला लावतात आणि सकाळी उठल्यानंतर तो चार्जरमधून काढतात. त्यामुळे रात्रभर मोबाईल १०० टक्के चार्ज होऊनही चार्जिंगला जोडलेला असतो. मात्र, असे केल्याने मोबाईलची बॅटरी खराब होते का? तिचे आयुष्य कमी होते का? असे प्रश्न अनेकांना पडतात.
बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम काय करते
सध्याच्या स्मार्टफोनमध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम असल्यामुळे बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर चार्जिंग नियंत्रित केली जाते. त्यामुळे रात्रभर फोन चार्जिंगला ठेवल्याने बॅटरी लगेच खराब होत नाही. मात्र, मोबाईलची बॅटरी सतत १०० टक्के चार्ज ठेवणे चांगले मानले जात नाही. दीर्घकाळ बॅटरी पूर्ण चार्ज स्थितीत राहिल्यास कालांतराने तिच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेले ऑप्टिमाइज्ड चार्जिंग किंवा चार्जिंग लिमिट हे फीचर वापरणे फायदेशीर ठरते. या फीचरमुळे फोनची चार्जिंग प्रक्रिया नियंत्रित करता येते आणि बॅटरीचे आयुष्य टिकवण्यास मदत होते.
चार्जिंगदरम्यान तापमानाची काळजी घ्या
मोबाईल चार्ज करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे फोनचे तापमान. चार्जिंगदरम्यान मोबाईल जास्त गरम होणे बॅटरीसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे फोन उशीखाली किंवा बंदिस्त जागेत ठेवून चार्ज करू नका. तसेच गरजेनुसार जाड कव्हर काढून फोन चार्ज करा. शक्यतो कंपनीने दिलेला किंवा चांगला चार्जर आणि केबलच वापरा. खराब दर्जाच्या चार्जिंग अॅक्सेसरीजमुळे फोनच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, मोबाईलची बॅटरी खराब होण्यामागे केवळ रात्रभर चार्जिंगला ठेवणे हे एकमेव कारण नाही. वाढते तापमान, सतत फोनचा वापर, चुकीच्या चार्जिंगच्या सवयी आणि कालांतराने होणारे केमिकल बदल यांचाही बॅटरीच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे रात्रभर मोबाईल चार्जिंगला ठेवण्याची सवय असली तरी घाबरण्याची गरज नाही. मात्र, बॅटरीचे आयुष्य दीर्घकाळ टिकवायचे असेल तर योग्य चार्जर वापरणे, फोन गरम होऊ न देणे आणि चार्जिंग ऑप्टिमायझेशन फीचर सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा