सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर जारी केले आहे. आता या फीचरनंतर मुलांच्या एक्स अकाऊंटचा कंट्रोल पालकांकडे असणार आहे. एक्सवरील किशोरवयीन वापरकर्त्यांच्या अकाऊंटसाठी पॅरेंटल कंट्रोल फीचर जोडण्यात आले आहे. या नव्या फीचरमुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या एक्स अकाऊंटवर कंट्रोल ठेवण्याचा पर्याय मिळणार आहे. मुलं प्लॅटफॉर्मवर कोणत्या प्रकारचा कंटेंट बघत आहेत आणि कोणासोबत संवाद साधत आहेत, यावर पालकांची नजर असणार आहे. मात्र, इतर अनेक प्लॅटफॉर्म्स ज्या प्रकारे अशी नियंत्रणे लागू करतात, त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने एक्सने यामध्ये एक बदल केला आहे. त्यांनी किशोरवयीन मुलांना या विषयावर आपले मत मांडण्याचा आणि त्याबाबत माहिती मिळवण्याचा अधिकार दिला आहे.
पालकांना कोणती सुविधा मिळणार?
पॅरेंटल कंट्रोल फीचरमध्ये पालकांना अनेक सुविधा मिळणार आहेत. पालक पाहू शकतात की, त्यांचा मुलगा प्रत्येक आठवड्याला किती वेळ एक्स प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे. पालकांना मुलांच्या एक्स अकाऊंटसाठी डेली लिमिट सेट करण्याचा पर्याय मिळणार आहे. नवीन फॉलोवर्ससाठी पालकांची परवानगी गरजेची असणार आहे. फीड रिकमेंडेशंस आणि व्हिडीओ केवळ आधीच फॉलो करत असलेल्या अकाऊंटपुरते मर्यादित असणार आहेत. तसेच पालक ठरवू शकतात की, मुलांना डायरेक्ट मेसेज कोण पाठवू शकतो.
13 ते 17 वर्षीय वापरकर्त्यांची अकाऊंट्स डिफॉल्ट स्वरुपात प्रोटेक्टेड मोडमध्ये सेट केली जाणार आहेत. त्यामुळे किशोरवयीन वापरकर्त्यांच्या अकाऊंटची सुरक्षा आधीपेक्षा वाढणार आहे.
हे फीचर का आणले गेले?
काही महिन्यांपूर्वी एक्सवर टीका करण्यात आली होती की, प्लॅटफॉर्मवरील एआय चॅटबोटचा वापर करून लहान मुलं आणि स्त्रियांचे चुकीच्या पद्धतीने तयार केले जाणारे फोटो रोखण्यासाठी प्लॅटफॉर्मवर पुरेसे कंट्रोल्स नाहीत. अशातच आता कंपनीने मुलांच्या अकाऊंटची सुरक्षा वाढवण्यासाठी नवीन फीचर सादर केले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा