अभिनेता आणि मॉडेल सोराब बेदी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. डेलनाझ दारूवालासोबतच्या नात्याची जाहीर कबुली दिल्यानंतर त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. डेलनाझ त्याच्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठी आहे. दोघांचे खासगी फोटो समोर आल्यानंतर वाद आणखी वाढला होता. आता सोराबने या ट्रोलिंगवर उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे.
पॉडकास्टमध्ये ट्रोलिंगवर स्पष्ट भूमिका
अलीकडेच सोराब एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. तिथे त्याने ट्रोलिंग आणि डेलनाझसोबतच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने चर्चा केली. नाते जाहीर केल्यानंतर झालेल्या ट्रोलिंगबद्दल त्याला कोणताही पश्चात्ताप नसल्याचे त्याने सांगितले. डेलनाझला मिळणाऱ्या अश्लील टिप्पण्यांबद्दल विचारले असता त्याने संताप व्यक्त केला. असे बोलणाऱ्या व्यक्तीला तो धडा शिकवेल, असा इशाराही त्याने दिला.
वयाच्या अंतरावरही दिले उत्तर
सोराब आणि डेलनाझ यांच्यात नऊ वर्षांचे वयाचे अंतर आहे. याबद्दल बोलताना सोराब म्हणाला की, वयाने मोठ्या असलेल्या स्त्रीकडे आकर्षित होणारा तो पहिला किंवा एकमेव व्यक्ती नाही. त्यामुळे ही ट्रोलिंग अन्यायकारक असल्याचे त्याचे म्हणणे आहे. या ट्रोलिंगचा आपल्यावर काहीही परिणाम होत नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. डेलनाझ त्याला नवे प्रोजेक्ट्स मिळवून देण्यास मदत करते, यावरही त्याने प्रतिक्रिया दिली. ती मदत करत असेल तर त्यात गैर काय, असा सवाल त्याने उपस्थित केला.
प्रतिक्रिया व्यक्त करा